राज्याच्या सत्तेचे केंद्र असलेल्या मंत्रालय परिसरात आपले कार्यालय असावे ही सर्वच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची इच्छा राज्य सरकारने पूर्ण करताना प्रत्येकी एक बरॅक उपलब्ध करून दिली. पण राष्ट्रवादी काँग्रेसने हळूहळू आपला पसारा वाढवितानाच दोन बराकी आणि मैदान कवेत घेतले आणि सारा परिसरच पंचतारांकित पद्धतीने चकाचक केला आहे.
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, जनता दल, शिवसेना, रिपब्लिकन पक्षांचे विविध गट, शेकाप या मान्यताप्राप्त पक्षांनी आपली कार्यालये मंत्रालय परिसरात शासकीय बराकींमध्ये थाटली आहेत. प्रत्येक पक्षाला एक बरॅक देण्यात आली आहे. राष्ट्रवादीने मात्र दोन बराकी आणि लगतचे मोकळे मैदानही आपल्या कार्यालयासाठी मिळविले आहे. यासाठी अर्थात, राष्ट्रवादीची ‘दादागिरी’ कामाला आली आणि पक्षाच्या कार्यालयाचा पसारा वाढला. राष्ट्रवादीच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन पुढील शुक्रवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर २००० मध्ये या पक्षाला शासकीय कोषागाराशेजारील जागा मिळाली. अन्य पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीचे कार्यालय पहिल्यापासूनच चकाचक करण्यात आले होते. राष्ट्रवादीचा सुरुवातीपासूनच शेजारील जागेवर डोळा होता. शेजारील जागा समाजवादी पार्टीला मिळणार होती. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीतून सूत्रे हलविली आणि समाजवादी पार्टीने त्या जागेवरील दावा सोडून दिला. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने शेजारील शासकीय गोदाम ताब्यात घेतले. मागील मैदानही राष्ट्रवादीच्या ताब्यात आले. एकूणच मंत्रालय परिसरातील सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या ताब्यात सर्वाधिक जागा आली आहे.
शासकीय कोषागाराच्या ताब्यात असलेली काही जागाही राष्ट्रवादीने ताब्यात घेतली. त्यासाठी पक्षाकडे असलेले वित्त खाते कामाला आले. गेले सहा महिने कार्यालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरू होते. पंचतारांकित हॉटेलची आठवण व्हावी या पद्धतीने ते चकाचक करण्यात आले आहे. नेत्यांसाठी भरपूर दालने तयार करण्यात आली आहेत. राष्ट्रवादीने सत्तेचा दुरुपयोग करून जागा पदरात पाडून घेतल्याचा आरोप होत असला तरी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी मात्र त्याचा इन्कार केला. पक्षाने सर्व परवानग्या मिळविल्या आहेत. शेजारील जागा गेली दोन वर्षे पक्षाच्या ताब्यात होती. त्याचे नुतनीकरण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.