विलेपार्ले येथील मिलन सब-वे जवळील घटना

भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पाच तरुण ठार झाल्याची घटना गुरुवारी पहाटे विलेपार्ले येथील मिलन सब-वे जवळ घडली. गाडी इतकी वेगात होती की धडकेनंतर तिचा चेंदामेंदा झाला.  गाडीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाला कटरच्या साहाय्याने गाडीच्या टपाचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावे लागले.

मीरारोडच्या काशीमीरा येथे राहणारे मुझम्मिल कनोजिया (२२), जुनेद शेख (२१), दिलीप सोलंकी (२१) आणि अ़फ्सर अली (२१) हे चारजण बुधवारी रात्री उशिरा फिरण्यासाठी  निघाले. मुंबईत जाऊन फेरफटका मारुन येऊ, असे मुझम्मिलने इतर मित्रांना सांगितले होते. त्याच्या मामाची गाडी घेऊन तो इतर चार जणांना घेऊन निघाला होता. चौघांसोबत मुंबई सेंट्रल येथे राहणारी राशिदा शेख (२५)ही तरुणीही होती. पश्चिम द्रुतगती मार्गावर जात असताना मिलन सब-वे जवळ आल्यावर मुझम्मिलचे गाडीवरील नियंत्रण हरविले आणि त्यानंतर गाडी झाडावर आदळले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. गाडी इतक्या वेगात झाडावर आदळली की, तिच्या पुढच्या काचेचा चुराडा तर, गाडीचा चेंदामेंदा झाला होता.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असता गाडीची अवस्था पाहून त्यांनी अग्निशनम दलाला पाचारण केले. दलाच्या जवानांनी कटरच्या साहाय्याने गाडीच्या टपाचा भाग कापून काढून पाचही जणांना बाहेर काढून कूपर रुग्णालयात नेले.

जुनेदचा रुग्णालयात पोहोचल्यानंतर मृत्यू झाला तर इतर चारही जणांचा मृत्यू गाडीत जागेवरच झाला. चौघांनी आपल्या घरी मित्राच्या वाढदिवसाला जात असल्याचे सांगितले होते, मात्र चौघेही घरी खोटे बोलून निघाल्याचे चौकशीतून स्पष्ट होत आहे. मुझम्मिल मद्यप्राशन करुन गाडी चालवत होता का, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, विलेपार्ले पोलीसांकडून स्पष्ट करण्यात आले. पोलिसांनी मुझम्मिलवर भरधाव वेगात गाडी चालवून इतरांच्या जीवाला धोका पोहोचविण्याचा गुन्हा नोंदविला आहे.

कुटुंबीय अनभिज्ञ

अपघातात मृत्यूमुखी पडलेले पाचही जण एकमेकांचे मित्र असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना नव्हती. बुधवारी रात्री निघताना कोणीही आपण जात आहोत, याविषयी कुटुंबीयांना सांगितले नव्हते. प्रत्येक जण वेगवेगळ्या वेळेत घरातून निघुन गेल्याचे नातेवाइकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.रात्रभर बाहेर राहून दुसऱ्या दिवशी घरी जाण्याचा बेत त्यांनी आखला होता. अपघाताची माहिती कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांना जबर धक्का बसला. मुझम्मिल, जुनेद, दिलीप आणि अफसर हे एकमेकांना ओळखत होते.  मात्र राशिदाला त्यांच्या पकी कोणीही ओळखत नसल्याचे यांचा मित्र अरमान चारोलिया याने सांगितले. संध्याकाळपर्यंत अ़फ्सरशी बोलणे झाले होते मात्र आज सकाळी त्याच्याविषयी ही माहिती कळाली.