मुंबई : मुंबईत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून, सध्या ६,६५४ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. बुधवारी दिवसभरात ५०१ करोनाबाधितांची नोंद झाली, तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईतील एकूण बधितांची संख्या ३,०४,१२२; तर मृतांची संख्या ११,२६६ वर पोहोचली आहे. बुधवारी दिवसभरात ४९० रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २ लाख ८५ हजाराहून अधिक म्हणजेच ९४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून सध्या ६६५४ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी सुमारे दोन हजार रुग्णांना लक्षणे असून सुमारे ३०० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.२१ टक्क्यावर स्थिर आहे. रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी तब्बल ४११ दिवसांपर्यंत म्हणजे सुमारे वर्षभरापेक्षा जास्त वाढला आहे.

राज्यात दिवसभरात ३,०१५ रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ३,०१५ करोनाबाधित आढळले, तर ५९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४६,७६९ रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत १९ लाख ९७ हजार करोनाबाधित झाले असून, ५०,५८२ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात ३७२ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात दिवसभरात ३७२ करोना रुग्ण आढळून आले, तर चार जणांचा मृत्यू झाला. बुधवारी ठाण्यात १२६, नवी मुंबई ७९, कल्याण डोंबिवली ७६, मीरा भाईंदर २९, बदलापूर २७, ठाणे ग्रामीण १९, उल्हासनगर ८, भिवंडी ५, अंबरनाथमध्ये ३ रुग्ण आढळले. मृतांमध्ये ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि ग्रामीणमधील प्रत्येकी एका रुग्णाचा सामावेश आहे.