येथील मढजवळील जंगलात शिकार करणारे कल्याण तालुक्यातील सहा तरुणच शहापूर वनाधिकाऱ्यांचे शिकार झाले आहेत. काल रात्री या सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन मृत जंगली ससे, १२ बोअरची एक बंदूक, १९ काडतुसे, सर्चलाइट व स्कॉर्पिओ जीप असा ऐवज वनाधिकाऱ्यांनी जप्त केला आहे.
संदीप एकनाथ गायकवाड (३०), उमेश हरदेव राजभर (३५, दोघेही राहणार तिसगाव), सापर्डे येथे राहणारे भगवान बळीराम पाटील (४३), अरुण पांडू मढवी (४५) व अनिल मंगळ पारधी (२५) आणि चक्कीनाका येथे राहणारा संदेश किसन पवार (३२) या आरोपींना वनाधिकाऱ्यांनी अटक केली असून त्यांच्यावर भारतीय वन्यजीव अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी रात्री ११ च्या सुमारास शहापूरमधील अंबर्जे-मढ परिसरात शिकारीसाठी काही जण येणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. याबाबत शहापूरचे उपवनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर. एम. पवार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी शिकारीसाठी आलेल्या सहा तरुणांना ताब्यात घेतले.