मुंबईतील कांदिवली या उपनगरातून ८ बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. हे ८ ही जण या ठिकाणी बेकायदेशीर रित्या राहात होते अशी माहिती महाराष्ट्र एटीएसच्या नागपाडा युनिटला मिळाली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या ८ ही जणांकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत तसेच हे सगळे बांगलादेशातून आलेले आहेत अशी माहिती एटीएसला मिळाली त्यानंतर या सगळ्यांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेले ८ ही जण १८ ते २२ या वयोगटातील पुरुष आहेत. तसेच बांगलादेशातील जसूर या भागात राहणारे आहेत अशी माहिती एटीएसने दिली आहे. या सगळ्यांवर चुकीच्या पद्धतीने एका देशातून दुसऱ्या देशात घुसखोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९४६ च्या फॉरेनर्स अॅक्ट अन्वये या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्यांची चौकशी केली असता त्यांनी आपण बांगलादेशचे रहिवासी असल्याची कबुली दिली आहे.

या सगळ्यांना ३१ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या असेंब्लिंगचे काम हे सगळेजण करत होते अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. ३१ मार्चपर्यंतच्या पोलीस कोठडीत या सगळ्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेल्या ८ पैकी २ जणांनी भारतातील पॅन कार्ड ओळखपत्र म्हणून सादर केले आहे. अशा प्रकारे आणखी काही लोक मुंबईतील उपनगरात राहात आहेत का याची चौकशी आता महाराष्ट्र एटीएसतर्फे केली जाते आहे.