मुंबई : घाटकोपर येथे सोमवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास महाकाय लोखंडी जाहिरात फलक वादळी वाऱ्यामुळे कोसळून पेट्रोल पंपावर पडला. १४० बाय १४० चौरस फुटांचा हा फलक क्षणार्धात आदळल्यामुळे जवळ उभी असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. यातील आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना दिली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. दुर्घटनेत किमान ५३ जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य एका दुर्घटनेत वडाळ्यात एका इमारतीचा पार्किंग टॉवर कोसळून एक जण जखमी झाला.

पूर्व द्रुतगती मार्गावर छेडानगर परिसरात पेट्रोल पंपाजवळील फलक मुळाशी असलेले लोखंडी खांब मोडून जमिनीवर आदळला. या दुर्घटनेच्या ध्वनीचित्रफिती काही मिनिटांतच समाजमाध्यमांवर फिरू लागल्या. पाऊस पडत असल्यामुळे पेट्रोल पंपाच्या परिसरात अनेक वाहनचालक, पादचारी आडोशासाठी उभे होते. त्यांच्यावरच हा महाकाय फलक कोसळल्यामुळे अनेक जण गाडले गेले. हे दृश्य अतिशय भीषण होते. पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, बीपीसीएल, महानगर गॅस आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या प्राधिकरणांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. रात्री उशीरापर्यंत मदतकार्य सुरू होते. फलक लोखंडी असल्याने क्रेनशिवाय बाजूला करणे अथवा उचलणे शक्य नव्हते. त्यामुळे बराच वेळ मदतकार्य सुरूच होऊ शकले नाही. याच दरम्यान किरकोळ मार लागलेल्या दहा ते बारा जणांना पोलिसांनी तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. यावेळी दबलेले अनेकजण मदतीची याचना करत होते. मदतीसाठी होर्डींगच्या खालून येणारे आर्त आवाज हेलावून टाकणारे होते.

हेही वाचा >>> वळीवाचा तडाखा, प्रवाशांचे हाल; रेल्वे, मेट्रो ठप्प, विमान सेवेवर परिणाम

बघ्यांची मोठी गर्दी

पूर्व द्रुतगती मार्गाला लागूनच पेट्रोल पंप असल्याने घटना घडल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. चालकांनी रस्त्यालगत वाहने थांबविल्याने बराच वेळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. घटना पाहण्यासाठी बाजूला असलेल्या लोकवस्तीमधून नागरिक धावल्याने गर्दीत भर पडली. अखेर पोलिसांनी सर्वांना बाजूला केल्यानंतर मदतकार्य सुरु झाले.

फलकाला परवानगी कुणाची?

फलक असलेली जागा मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या नावे आहे. फलक उभे करण्यासाठी आपण कार्यभार स्वीकारण्यापूर्वी परवानगी देण्यात आली होती, असा दावा लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केला. फलकाला परवानगी कुणाच्या अखत्यारित देण्यात आली, याची चौकशी सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.

रेल्वे, मेट्रो ठप्प; विमान सेवेवर परिणाम

मुंबई : मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसराला सोमवारी वळिवाच्या सरींनी वादळी वाऱ्यांसह हजेरी लावली. पहिल्याच पावसाने मुंबईतील वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली. सकाळी ठाणे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे तर दुपारनंतर वादळ आणि पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली. दिवसभरांत मध्य रेल्वेवरील १५० तर पश्चिम रेल्वेवरील २६ फेऱ्या रद्द झाल्या. मेट्रो सेवाही विस्कळीत झाली. विमानसेवेलाही फटका बसला.