मुंबई : मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसराला सोमवारी वळीवाच्या सरींनी झोडपून काढले. पहिल्याच पावसाने मुंबईतील वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली. सकाळी ठाणे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे तर दुपारनंतर वादळ आणि पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली. सायंकाळी पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या सेवेवरही परिणाम झाला. दिवसभरांत मध्य रेल्वेवरील १५०, तर पश्चिम रेल्वेवरील २६ फेऱ्या रद्द झाल्या. यामध्ये मेट्रो सेवाही विस्कळीत झाली. त्यामुळे नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल झाले.

सोमवारी सकाळी ९.१६ वाजता मुलुंड-ठाणे स्थानकादरम्यान अचानक सिग्नल यंत्रणेत बिघाड निर्माण झाल्याने लोकलसेवा ठप्प झाली. सकाळी १०.१५ वाजता सिग्नलची दुरुस्ती झाली. दरम्यानच्या काळात प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. दुपारी १२ नंतरही अनेक लोकल तासभर उशिराने धावत होत्या. मध्य रेल्वेचे वेळापत्रक सुरळीत होत नाही तोच दुपारनंतर महानगरात जोरदार वादळवारा आणि पाऊस झाला. यात ठाणे-मुलुंड दरम्यान दुपारी ४.१५ वाजता ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड झाला. तसेच बदलापूर येथे ओव्हर हेड वायरवर झाडाची फांदी पडली. परिणामी ही सेवा पुन्हा खंडित झाली.

पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड येथे सायंकाळी ४.३० वाजता सिग्नल बिघाड झाल्याने, पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे काही मुंबईकरांनी बेस्ट बसचे स्थानक गाठले. मात्र झाड्यांच्या फांद्या पडल्यामुळे, वाहतूक कोंडीमुळे अनेक बसचे मार्ग बदलण्यात आले होते.

हेही वाचा >>> मुंबई: पालिकेच्या परवानगी शिवाय चार जाहिरात फलक, फलकाच्या आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग

मेट्रोही रखडली

वादळीवारा सुरू झाल्यानंतर मेट्रो-१ मार्गिकेवरील एअरपोर्ट स्थानकाजवळील ओव्हर हेड वायरवर जोरदार वाऱ्यामुळे कापड अडकले. यामुळे दुपारी साडेचारच्या सुमारास ही सेवा काही वेळासाठी विस्कळीत झाली. अवघ्या काही मिनिटातच सेवा पूर्ववत झाल्याची माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) कडून देण्यात आली. दुपारी सव्वाचारच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे बॅनर उडून मेट्रो ७ मार्गिकेतील मोगरा ते गुंदवलीदरम्यानच्या स्थानकावरील ओव्हरहेड वायरवर पडले आणि त्यामुळे मेट्रो ७ ची सेवा विस्कळीत झाली.

विमाने खोळंबली

मुंबईतील खराब हवामान, कमी दृश्यमानता आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने ६६ मिनिटे विमानांचे आगमन, निर्गमन तात्पुरते स्थगित केले. त्यानंतर सायंकाळी ५.०३ वाजता सेवा सुरू केली. या कालावधीत १५ विमाने इतरत्र उतरवण्यात आली. यामुळे अनेक विमानांचे उड्डाण आणि आगमन उशीरा झाले.

कुर्ला, विक्रोळी, भांडुपचा पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई : वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे सोमवारी सायंकाळी पवईतील २२ किलोव्हॅट विद्याुत उपकेंद्राचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, पवई उदंचन केंद्राला होणारा विद्युतपुरवठाही खंडित झाला. परिणामी, कुर्ला आणि भांडुपमधील काही परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मुंबई आणि उपनगरात सोमवारी सायंकाळी जोरदार वादळी पाऊस झाला. यावेळी पवई येथील उदंचन केंद्राला होणारा विद्याुतपुरवठाही खंडित झाला. तसेच या विद्याुत उपकेंद्रातील अनेक उपकरणांमध्ये बिघाड झाला. अनेक ठिकाणच्या वीजवाहिन्याही तुटल्या असून, अनेक महत्त्वाच्या उपकरणांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुरुस्तीच्या कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता असल्याने भांडुपमधील मोरारजी नगर, जयभीम नगर, पासपोली गावठाण, लोकविहार सोसायटी, रेनेसान्स हॉटेल परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. तर महात्मा फुले नगरच्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पाऊस किती?

हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्रात सोमवारी सरासरी २०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर,पालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणेच्या नोंदीनुसार दादर, माहीम भागात १८ मिलीमीटर, भांडुप ७८, मुलुंड ६७ , कुर्ला ४२, विक्रोळी ३१, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द येथे ३२ मिलिमीटर तर गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले पूर्व भागात ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.