आठ तासांच्या प्रवासानंतर ८ पेंग्विन मुंबईत दाखल
लटपट, लटपट चालत बर्फाइतक्या थंडशार पाण्यात डुबकी मारणारे तुंदीलतनू पेंग्विन अखेर भायखळय़ाच्या राणीबागेत दाखल झाले. कोरियाहून आठ तासांचा विमान प्रवास करून आलेल्या या काळय़ा कोटवाल्या दरबाऱ्यांचे राणीच्या बागेतील मंडळींनी शानदार स्वागत केले. एक ते तीन वर्षे वयोगटातील पाच मादी आणि तीन नरांचा या ताफ्यात समावेश असून त्यांची उत्तम बडदास्त ठेवण्यात येत आहे. वातावरणाशी जुळवून घेईपर्यंत या पाहुण्यांना स्वतंत्र ‘शामियान्या’त ठेवण्यात आले असून येथे त्यांच्यासाठी माशांची रग्गड मेजवानीही ठेवण्यात आली आहे.
सतत नकारात्मक कारणांसाठी चर्चेत असलेल्या राणीबागेत अनेक वर्षांनंतर नवीन सदस्यांच्या आगमनाने आनंद पसरला आहे. गेली तीन वर्षे सतत चर्चेत असलेल्या पेंग्विनचे आगमन अखेर मंगळवारी पहाटे चार वाजता झाले. दक्षिण कोरियातील सोल येथील ‘कोएक्स’ या मत्स्यालयातून सायंकाळी निघालेले हे पेंग्विन एअर कार्गो विमानाने अंधेरीतील सहार एअर कार्गो विमानतळावर आठ तासांचा प्रवास करून आले. त्यांना वातानुकूलित वाहनाने पहाटे चार वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात दाखल करण्यात आले. यात पाच मादी आणि तीन नर पेंग्विन आहेत. त्यांची निगा राखण्यासाठी गोवा ट्रेड संस्थेचे वरिष्ठ डॉ. रत्नकुमार हे देखील मुंबईत आले आहेत.
हे आठही पेंग्विन एक ते तीन वर्षे वयोगटातील असून यातील दोघे फक्त एका वर्षांचे आहेत. त्यामुळे जंतुसंसर्गापासून बचावासाठी त्यांना पुढील दोन महिने ‘क्वारंटिन’ कक्षात ठेवण्यात येईल. या २५० चौरस फुटांच्या कक्षातील तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत नियंत्रित करण्यात आले आहे. या कक्षात दबकत दबकत दाखल झालेल्या पेंग्विननी नंतर मात्र छोटेखानी तलावात डुबकी मारून प्रवासाचा क्षीण घालवला. या वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर प्राणी संग्राहालयाच्या नवीन इमारतीच्या तळ मजल्यावरील सुमारे १७०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या वातानुकूलित पेंग्विन प्रदर्शन कक्षात त्यांना स्थलांतरित करण्यात येईल. सकाळी साडेदहाच्या सुमारास पेंग्विनना बांगडा, मोरशी असे मासे खाऊ घालण्यात आले, मात्र लांबच्या प्रवासाने शिणलेल्या पेंग्विनपैकी फक्त दोघांनीच सकाळची ही न्याहरी केली. हे पेंग्विन फार लहान असल्याने त्यांना रुळण्यासाठी आठवडाभर लागणार असल्याचे माहिती उद्यानाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. त्यांच्या गळ्यावर रंगीत पट्टे असल्याने त्यांना ब्लू रिंग आणि रेड रिंग अशीच ठेवण्यात आली आहेत. लवकरच त्यांची भारतीय पद्धतीची नावे दिली जातील, असेही डॉ. त्रिपाठी म्हणाले. या पेंग्विनच्या देखभालीसाठी ऑस्ट्रेलियातील ऑशियानीस या कंपनीला पाच वर्षांसाठी पेंग्विनच्या देखरेखीचे काम देण्यात आले असून ऑशियानीस या कामासाठी हायवे कन्स्ट्रक्शन या एजन्सीची नेमणूक केली आहे. पाच वर्षांत त्यांच्या देखरेखीसाठी तसेच जागेच्या स्वच्छतेसाठी किमान २० कोटी रुपये इतका खर्च येऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* पेंग्विनचे आवडते खाद्य म्हणजे बांगडा, मांदेली, मुरशी प्रजातीचे मासे. रोज अर्धा ते एक किलो मासे खाद्य.
* हे पेंग्विन २५ ते ३० वर्षे जगू शकतात
* या पेंग्विनची सध्याची उंची १२ ते १५ सेंटीमीटर असून वजन एक ते अडीच किलो आहे.
* पूर्ण वाढ झालेल्या पेिग्वनची उंची ६० ते ६५ सेंटीमीटर तर वजन ४ ते ६ किलोपर्यंत वाढते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 penguins arrive at mumbai rani baug
First published on: 27-07-2016 at 02:40 IST