scorecardresearch

Good News: ८० टक्के मुंबईकर करोनाच्या संपर्कात, तिसरी लाट कमी धोकादायक-TIFR

तिसऱ्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेइतकी नसेल असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे.

Good News: ८० टक्के मुंबईकर करोनाच्या संपर्कात, तिसरी लाट कमी धोकादायक-TIFR
राज्यात आज रोजी एकूण ९६,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.(प्रातिनिधिक छायाचित्र)

साधारण ८० टक्के मुंबईकर करोनाच्या संपर्कात येऊन गेले असल्याची शक्यता असल्याने तिसऱ्या लाटेचा धोका मुंबईकरांना तुलनेने कमी असेल, असं टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या संशोधकांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र ह्या अभ्यासात दुसऱ्यांदा करोना होणाऱ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. तिसऱ्या लाटेमध्ये पुन्हा करोना होणं हा धोका असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

भारतात करोनाचा शिरकाव होऊन १७ महिन्यांहूनही अधिक काळ आता लोटला आहे. त्यामुळे ज्यांना अगदी सुरुवातीला पहिल्या लाटेतच करोना होऊन गेला, त्यांच्यातली प्रतिपिंडे आता कमी झाली असतील. त्यामुळे त्यांना या तिसऱ्या लाटेचा धोका आहे, असं या संस्थेचे अभ्यासक आणि डीन डॉ. संदिप जुनेजा यांनी सांगितलं. स्थानिक प्रशासनाने पुनर्बाधितांवर लक्ष केंद्रित करायला हवं आणि लवकरात लवकर त्यांना तिसऱ्या लाटेपासून दूर कसं ठेवता येईल याचा विचार करायला हवं असंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे अजूनही ज्यांना करोनाची लागण झालेली नाही, अशा २० टक्के लोकांचं संपूर्ण लसीकरण लवकरात लवकर करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा – मुंबईतील निम्म्याहून अधिक मुलांमध्ये प्रतिपिंडे

ते म्हणाले, करोना होऊन गेलेल्या ८० टक्के नागरिकांपैकी १० टक्क्यांना पुन्हा लागण होईल असं गृहीत धरुया. त्यांना लागण झाल्यावर तशाच प्रकारची लक्षणं दिसतील आणि त्याच क्रमाने ते बरे होतील. करोनाच्या तिसऱ्या लाटेवर परिणाम करणारे तीन घटक मानता येतील- एक म्हणजे नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी ठरेल, दुसरं म्हणजे राज्यातले ६० टक्क्यांहून अधिक निर्बंध उठवणे आणि सगळ्यात म्हणजे करोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन.

साधारण सप्टेंबरमध्ये आपल्याला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल. पण पुनर्बाधितांना सौम्य लक्षणं असतील, नवा कोणताही व्हेरिएंट आला नाही, जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकऱण झालं, आणि लस ७५ ते ९५ टक्के प्रभावी ठरली तर मात्र या तिसऱ्या लाटेचा धोका आणि तीव्रता कमी होऊ शकते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या