* पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण; रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

* एका वर्षांच्या काळात दोन अतिरिक्त मार्गिकाही बांधून तयार

कोकणातील प्रवाशांना आणि सावंतवाडीसारख्या पर्यटनस्थळाला संपूर्ण देशाशी जोडण्यासाठी महत्त्वाच्या अशा सावंतवाडी टर्मिनसच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता या कामाचा ९.०५ कोटी रुपयांचा दुसरा टप्पा सुरू झाला असून येत्या वर्षभरात हे कामदेखील पूर्ण होणार असल्याचे कोकण रेल्वे महामंडळातर्फे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी जूनमध्ये या कामाच्या भूमिपूजनाच्या वेळी पहिला टप्पा एका वर्षांत पूर्ण करण्याचे अभिवचन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले होते. त्यानुसार हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी २७ जून रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी रोड टर्मिनसचे भूमीपूजन केले होते. त्यानंतर गेल्या वर्षभरात ११.४२ कोटी रुपयांचा निधी खर्च करून या टर्मिनसचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण रेल्वेमंत्र्यांच्याच हस्ते १९ जून रोजी करण्यात आले.

या पहिल्या टप्प्यात छतासह नवीन प्लॅटफॉर्म, पादचारी पूल, दोन नव्या मार्गिका आदी महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. त्याशिवाय या टप्प्यात टर्मिनल प्लॅटफॉर्मवर चहाचा स्टॉल, पिण्याच्या पाण्याची सोय आणि उद्घोषणा प्रणाली अशा सोयीदेखील करून देण्यात आल्या आहेत. तसेच प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले आहेत.

आता या टर्मिनसच्या बांधकामाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यातील कामांसाठी ९.०५ कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. या टप्प्यात रेल्वेगाडय़ा धुण्यासाठीची आणि गाडय़ांमध्ये पाणी भरण्यासाठीची व्यवस्था, टर्मिनसची इमारत आणि टर्मिनसवर पोहोचण्यासाठीचा रस्ता आदी कामांचा समावेश आहे. हे काम येत्या एका वर्षांच्या आत पूर्ण होईल, असेही कोकण रेल्वे महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले.

पर्यटनाला चालना

दुसरा टप्पा पूर्ण झाल्यावर कोकण रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या अनेक गाडय़ा सावंतवाडी येथे थांबवणे तसेच सावंतवाडी येथून देशातील विविध भागांत गाडय़ा सोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.