आपल्यातील अनेकांना रोजनिशी लिहिण्याची सवय असते. त्यातील नोंदी त्या वेळी महत्त्वाच्या वाटत नसल्या तरी काही काळानंतर मात्र त्यांना ऐतिहासिक दस्तावेजाचे रूप येत असते. जागतिक साहित्यामध्ये तर रोजनिशीमधील लिखाणाला ग्रंथरूपात आणण्याची समृद्ध परंपराच आहे. मराठी वाङ्मयामध्ये एखाद्याच्या नोंदवहीमधील लिखाणाने ग्रंथरूप धारण केल्याचे उदाहरण मात्र विरळाच. परंतु, सुमारे ९० वर्षांपूर्वी खानदेशातील एका तरुणाने लिहिलेल्या आपल्या आठवणीवजा आत्मकथनाचे ‘जर्मन रहिवास’ हे पुस्तक लवकरच ‘लोकवाङ्मय गृह’ प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे.
ज्ञानपीठ पुरस्कारविजेते ज्येष्ठ लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकातून पहिल्या महायुद्धानंतर परदेशी शिक्षणासाठी गेलेल्या ग्रामीण भागातील तरूणाचे व त्या काळाचे भावविश्व उलगडणार आहे. जळगाव जिल्ह्यातील भालोद या गावी राहणारे तुकाराम गणू चौधरी हे १९२२ साली आपल्या दोन मित्रांबरोबर जर्मनीमध्ये तंत्रज्ञानातले उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात. तिथे वस्त्रनिर्मितीविषयक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन ते १९२५ मध्ये मायदेशी परततात. या तीन-साडेतीन वर्षांच्या काळात तिथे आलेले अनुभव, आठवणी त्यांनी आपल्या डायरीमध्ये नोंदवून ठेवल्या होत्या. या नोंदींना ग्रंथरूप न मिळाल्याने त्या ‘समृद्ध अडगळ’ बनून राहिल्या होत्या. मात्र आता डॉ. नेमाडे यांनी या हस्तलिखितांचे संपादन के ल्याने एका मराठी मुलाने ९० वर्षांपूर्वी वयाच्या पंचविशीत अनुभवलेले वास्तव या पुस्तकाच्या रूपाने वाचकांपुढे येणार आहे.
पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीच्या चलनाचा भाव घसरला. त्यामुळे तिथे शिक्षणासाठी जाणे तुलनेने स्वस्त बनल्याने चौधरी व त्यांचे मित्र गावकऱ्यांकडून वर्गणी काढून जर्मनीला जातात. जर्मनीला जाण्याच्या या धडपडीपासून बोटीचा प्रवास, बर्लीन शहर, तिथले शिक्षण, युद्धाचे भयानक परिणाम, नंतर इंग्लंडचा प्रवास आणि शेवटी भालोद गावी झालेले आगमन असातीन-साडेतीन वर्षांचा काळ पुन्हा जिवंत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुकाराम चौधरी कोण होते ?
जर्मनीत वस्त्रनिर्मितीचे उच्चशिक्षण घेतलेल्या चौधरींनी ठाणे, मुंबई व अहमदाबादमधल्या अनेक गिरण्यांमध्ये काम करून या क्षेत्रात उच्च पदापर्यंत मजल त्यांनी मारली. १९६२ मध्ये अमळनेर येथील प्रताप मिलला ऊर्जितावस्था आणली. नंतरच्या काळात त्यांनी अंबाला, अहमदाबाद, कानपूर, मुंबई, अमळनेर आदी ठिकाणी गिरण्या उभारल्या. तसेच ‘टेक्स्टाईल असोसिएशन ऑफ इंडिया’चे ते संस्थापक सदस्यही होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 90 years ago diary
First published on: 15-05-2016 at 00:10 IST