मुंबई : इकॉनॉमी क्लासचे तिकीट असल्यामुळे बिझनेस क्लासमधील आसनावरून उठवल्यामुळे संतप्त झालेल्या ४५ वर्षीय परदेशी महिलेने विमान प्रवासादरम्यान गोंधळ घातला. इतकेच नव्हे तर तिने विमानातील महिला कर्मचाऱ्यांना मारहाणही केली केली. तसेच ती अर्धनग्न अवस्थेत विमानात फिरत होती. विमान छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर उतरल्यानंतर सहार पोलिसांनी या महिलेला अटक केली. या महिलेची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अबूधाबी येथून सोमवारी पहाटे एक विमान छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी बिझनेस श्रेणीच्या आसन क्रमांक १ वर बसलेल्या महिलेकडे इकॉनॉनी श्रेणीचे तिकीट होते. इकॉनॉमी श्रेणीचे तिकीट असल्यामुळे बिझनेस श्रेणीमध्ये बसता येणार नाही, असे विमानातील कर्मचारी लाबत खान व शर्वीन यांनी या महिला प्रवाशाला सांगितले. त्यावेळी महिलेने लाबत खानच्या तोंडावर फटका मारला. शर्वीनने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी महिला तिच्या अंगावर थुंकली.
सर्व कर्मचारी या महिलेला शांत राहण्याचे आवाहन करीत होते. मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तसेच काही वेळाने तिने अंगावरील कपडे काढले आणि ती विमानातच अर्धनग्न अवस्थेत फिरू लागली. वैमानिकानेही या महिलेला शांत राहण्यास सांगितले. अखेर छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर विमान उतरल्यानंतर त्या महिलेला विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात आले. कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून महिलेविरोधात सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली. तिची जामीनावर सुटका करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.