सध्या तळोजा कारागृहात बंदिस्त असलेला कुख्यात गुंड अबू सालेम याने सोमवारी विशेष ‘टाडा’ न्यायालयाकडे अर्ज करीत आपल्या जिवाला धोका असून आपल्याला कारागृहाऐवजी गोवा किंवा दिल्ली येथील पोर्तुगाल दूतावासात ठेवण्याची अजब मागणी केली आहे.
हस्तांतरण करार रद्द करण्यात आल्यानंतर पुन्हा पोर्तुगालला पाठविण्याबाबतचा अंतिम निर्णय होईपर्यंत आपल्याला कारागृहाऐवजी गोवा अथवा दिल्ली येथील पोर्तुगाल दूतावासात ठेवण्याची विनंती सालेमने अर्जाद्वारे केली आहे. आपल्याला कुठल्याही कारागृहात ठेवले, तरी तेथे जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त करून सालेमने ही विनंती केल्याचे अर्जात म्हटले आहे. ठाणे कारागृहात हलविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत; परंतु येथे जिवाला धोका असल्याची तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले असे त्याचे म्हणणे आहे.