न्यायवैद्यक अहवालावर भवितव्य ठरणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भ्रष्टाचाराबाबतच्या वादग्रस्त ध्वनीफीत प्रकरणी राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीस ही चौकशी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे मोपलवार यांच्यासंदर्भातील ध्वनीफितीमधील आवाज त्यांचाच आहे का याबाबतच्या न्यायवैद्यक अहवालावर मोपलवार यांचे भवितव्य ठरणार आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून शेतकरी आणि विरोधकांच्या टीकेचा धनी ठरलेल्या मोपलवार यांच्या काही वाद्ग्रस्त ध्वनीफिती विरोधकांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात जाहीर केल्या होत्या. मोपलवार आणि मध्यस्थ यांच्यातील ऑडीओ क्लीपमधील संभाषणच सभागृहात सादर करण्यात आले होते. त्यावेळी मोपलवार यांच्या ध्वनीफितीतून ते मंत्रालयात कोणालातरी कोटय़वधी रूपये देण्याची भाषा करीत असून हे पैसे कोणाला देणार होते याची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. त्याचप्रमाणे मोपलवार यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचा आरोप झाला होता. भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनीही मोपलवार यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले असून या संपूर्ण आरोपांची चौकशी करण्यासाटी  सरकारने माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे.

जोसेफ यांच्याशिवाय या समितीमध्ये आर्थिक गुन्हे शाखा आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपायुक्तांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती पोलवार यांच्याशी संबधित सर्व ध्वनीफितीमधील आवाज त्यांचाच आहे का, पूर्वी काही प्रकरणात दाखळ झालेले गुन्हे, सभागृहात झालेले आरोप आणि आमदार गोटे यांनी केलेले आरोपांची चौकशी करणार असून समितीने दोन महिन्यात ही चौकशी पूर्ण करावी असे सांगण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागातील सूत्रांनी सांगितले. वाद्ग्रस्त ध्वनीफीतीमधील आवाज मोपलवार यांचाच आहे की त्याच्यात कोणी फेरफार केला आहे याची तपासणी न्याय वैद्यक प्रयोग शाळेतून केली जाणार असून या अहवालावरच मोपलवार यांचे भवितव्य अवलंबून आहे. मोपलवार फेब्रुवारी २०१८मध्ये सेवानिवृत्त होत असून त्यांची राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातील उठबस तसेच समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचा संपादन केलेला विश्वास यामुळे ही चौकशी एक फार्स ठरण्याची चर्चा मंत्रालयात ऐकावयास मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीवर गोटेंचा अविश्वास

नवी दिल्ली : महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे निलंबित उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या समितीवर विश्वास नसल्याची माहिती भाजपचेच धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये दिली.

मोपलवारांच्या चौकशीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची समिती नेमली आहे. पण माझ्यावर तिचा विश्वास नाही. कारण जोसेफ हेही स्वत: नोकरशहा होते. समितीतील अन्य दोघेही सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे चौकशी प्रामाणिकपणे होणार नसल्याची भीती असल्याचे गोटेंनी सांगितले. जोसेफ यांच्याऐवजी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीची समिती नेमण्याची आणि त्यामध्ये प्राप्तिकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी त्यांनी  केली.

मोपलवारांसह राज्यातील नऊ  अधिकाऱ्यांनी आपल्याकडील काळ्या पैशांची कोलकत्यामधील बनावट कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचविण्यासाठी मी दिल्लीत आलो असल्याचेही त्यांनी सांगितले.

फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या ४५ हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित मुंबई-नागपूरदरम्यानच्या समृद्ध महामार्गाची जबाबदारी मोपलवारांकडे होती. मात्र, भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर त्यांना निलंबित केले आहे. मोपलवार आणि गोटे हे दोघेही तेलगी बनावट मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणात आरोपी होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acb discreet inquiry against radheshyam mopalwar
First published on: 24-08-2017 at 01:48 IST