scorecardresearch

प्लास्टिकविरोधातील कारवाईला पुन्हा वेग; आतापर्यंत पावणेदोन लाख किलो प्लास्टिक जप्त.

करोना आणि टाळेबंदीमुळे खंडित झालेल्या प्लास्टिक बंदीच्या मोहिमेला आता पुन्हा एकदा वेग आला आहे
मुंबई : करोना आणि टाळेबंदीमुळे खंडित झालेल्या प्लास्टिक बंदीच्या मोहिमेला आता पुन्हा एकदा वेग आला आहे. गेल्या तीन वर्षांत पालिकेने पावणेदोन लाख किलो प्लास्टिक जप्त केले असून पाच कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत २०१८ च्या गुढीपाडव्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू केली होती. पालिकेनेही प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणी सुरू केली होती. प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाईसाठी पथके, प्लास्टिकला पर्याय असलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देणे आदी बाबी सुरू केल्या होत्या. मात्र मार्च २०२० मध्ये करोना संसर्ग आणि टाळेबंदीच्या काळात प्लास्टिक बंदी पूर्णपणे बारगळली होती. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पीपीई कीटपासून सर्वत्र प्लास्टिक दिसू लागले होते.प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापरही सर्रास होऊ लागला होता. आता मात्र करोना संसर्ग आटोक्यातआल्यामुळे पालिकेने प्लास्टिकविरोधातील कारवाईवर लक्ष केंद्रीत केले आहे.  नागरिक, व्यापारी, फेरीवाले यांनीप्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास ५ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

 प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पालिकेने निरीक्षकांची पथके तैनात केली होती. मार्केट, दुकाने व आस्थापना आणि  परवाना अशा तीन विभागातील निरीक्षकांचा या पथकात समावेश करून  विविध ठिकाणची दुकाने, मॉल, बाजारपेठा, मंडया, फेरीवाला क्षेत्र अशा ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करायला सुरूवात केली. मार्च २०२० पर्यंत  कारवाईत पालिकेने तब्बल ८० हजार किलो प्लास्टिक जप्त केले होते. मात्र मार्चमध्ये करोनामुळे टाळेबंदी सुरू झाली आणि ही कारवाई थंडावली. मात्र करोनाचा संसर्ग ओसरल्यानंतर पालिकेने कारवाई करून जानेवारी २०२२ पर्यंत १ लाख ७५ हजार ४२८ किलो प्लास्टिक जप्त केले. तसेच  ५ कोटी ३६ लाख ८५ हजार इतकी दंडवसुली करण्यात आली आहे.

२५ हजार रुपये दंड..

प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास, प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये,

तिसऱ्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची कैद अशी शिक्षा आहे. नियम काय?

महाराष्ट्र शासनाच्या २३ मार्च २०१८ च्या अधिसूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिबंधित प्लास्टिकवर (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणूक) बंदी घातलेली आहे. याअंतर्गत प्रतिबंधित प्लास्टिकपासून  बनवल्या  जाणाऱ्या पिशव्या (हॅण्डल असलेल्या व नसलेल्या), प्लास्टिकपासून बनविण्यात  येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या टाकाऊ वस्तू जसे की ताट, कप, ताटल्या (प्लेट), पेले (ग्लास), चमचे इत्यादीसह हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तू, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप किंवा पाऊच व सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातलेली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accelerate action against plastics so far 2 5 lakh kg plastic seized amy

ताज्या बातम्या