गोरेगावच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सकाळी झालेल्या विचित्र अपघातात दोन जण ठार झाले. रस्ता ओलांडणाऱ्या एका इसमाला मोटारसायकलने धडक दिल्याने मोटारसायकलस्वारासह तो इसम रस्त्यावर खाली पडला. नेमका त्याचवेळेस भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिल्याने ते दोघे जागीच ठार झाले.
गोरेगाव पूर्वेला न्यू अशोकनगर येथे बिलाल जमालुद्दिन शाह (५०) यांचे टेलरिंगचे दुकान आहे. सकाळी पावणेआठच्या सुमारास शाह त्यांच्या दुकानासमोर असलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील सार्वजनिक शौचालयात गेले होते. तेथून दुकानात परतण्यासाठी ते महामार्ग ओलांडत होते. त्यावेळी मोटरसायकलवरून भरधाव वेगाने आलेल्या मुरली चौहान (२६) याने त्यांना धडक दिली. या धडकेमुळे मुरली चौहान आणि बिलाल शाह दोघेही रस्त्यावर पडले. अवघ्या काही सेकंदात त्याच वेळेस दहिसरच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने या दोघांना धडक दिली. दुकानात असलेल्या शाह यांच्या मुलाने त्वरित दोघांना रुग्णालयात नेले. परंतु त्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. ट्रकचालक मुरलीधर यादव (२७) यास वनराई पोलिसांनी अटक केली आहे.