अपघात, वाहतूक कोंडीच्या समस्या; खड्डेमुक्त रस्ते करण्याची पालिकेकडे मागणी

मुंबई : गेल्या महिनाभरात कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावरील त्यामुळे खड्डा चुकवताना होणारी कसरत, रस्त्याभर पसरलेल्या खडीमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी अशा समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावे लागत आहेत. विशेष म्हणजे पावसाचा जोर ओसरून आठ दिवस लोटले, तरीही पालिकेला मुंबई खड्डेमुक्त करता आलेली नाही.

दरवर्षी जून-जुलैमध्ये मुसळधार पाऊस कोसळताच मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा होते. गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे यंदाही मुंबईतील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. चेंबूर ते सीएसएमटी, वांद्रे ते दहिसर, कुर्ला ते ठाणे या मुख्य रस्त्यांसह, लालबहादूर शास्त्री मार्ग, शहरातील अंतर्गत जोडरस्ते, गल्ल्या, स्थानिक विभागातील छोटे-मोठे रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. रस्तेच नव्हे तर उड्डाणपुलावरही खड्डे पडले आहेत. पेव्हर ब्लॉकचे रस्तेही ठिकठिकाणी खचल्याचे आढळून आले. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांचा अंदाज चुकू न अपघात होत आहेत. दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर पसरलेल्या खड्ड्यांतील डांबरमिश्रित खडीमुळे दुचाकींचे अपघात होऊ लागले आहेत.  शीव-भायखळा मार्गावरील परळ पुलावर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. माटुंगा पश्चिाम रेल्वे स्थानकाबाहेरच्या पुलाचीही हीच अवस्था आहे. शीव, धारावी, दादर, परळ, लालबाग, भायखळा, वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, डी. एन. नगर, भांडुप, घाटकोपर, विक्रोळी आदी ठिकाणच्या रस्त्यांची वाताहत झाली आहे. गोरेगाव येथील मृणालताई गोरे मार्गाकडे जाणारा रस्ता, ओशिवरा ते डी. एन. नगर मार्ग, मुलुंड चेकनाका या परिसरातील नागरिकांकडून  तक्रारी येत आहेत.

येथे तक्रारी करा!

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डेविषयक किंवा खराब पट्ट्या (बॅड पॅच) विषयक तक्रार करावयाची असल्यास ती ‘१९१६’ या दूरध्वनी क्रमांकावर करता येईल.

मुंबई महापालिकेच्या @mybmc या ट्विटर अकाऊंटला टॅग करूनही नागरिक खड्डेविषयक तक्रार करु शकतात.

रस्ता हा ज्या प्रशासकीय विभागातील आहे तेथील अभियंत्यांना थेट दूरध्वनी करून नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात. या अभियंत्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकही पालिकेने जाहीर केले आहेत.

पॉटहोल फिक्सिट अ‍ॅपवरही नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदवता येणार आहेत.

डांबरी रस्त्यावर अधिक खड्डे

पालिकेने मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून हाती  घेतले आहे. त्यामुळे खड्ड्यांची संख्या कमी होत असली तरी डांबरी रस्त्यांवर मात्र खड्डे पडू लागले आहेत. खड्ड्यांबाबत पालिकेच्या अ‍ॅपवर आतापर्यंत ४३७ तक्रारी आल्या आहेत. गेल्यावर्षी हीच संख्या ३१५ होती. पालिकेच्या अ‍ॅपवर किंवा पालिकेच्या अभियंत्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रारी केल्यानंतर एक-दोन दिवसात खड्डे बुजवले जात आहेत. मात्र काही ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी जे मिश्रण वापरले जात आहे ते पावसात वाहून जात असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत.