ज्येष्ठ छायाचित्रकार आणि बॉलीवूड अभिनेत्री अंतरा माळी हिचे वडील जगदीश माळी यांचे आज सकाळी अकराच्या सुमारास मुंबईतील नानावटी रूग्णालयात निधन झाले. माळी हे १९९८ पासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना किडनीचा त्रास होता अशी माहिती त्यांच्या जवळच्या अभिनेत्याने पीटीआयला दिली.
माळी यांनी ऐशीच्या दशकामध्ये आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. बॉलीवूड अभिनेत्री रेखा, शबाना आझमी, करीना कपूर, अनुपम खेर, ओम पुरी, इरफान खान आणि इतर बड्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले होते.
यावर्षी जानेवारी महिन्यात ते मुंबईतील रस्त्यावर फिरताना आढळले होते. मात्र, ते मानसिक रूग्ण झाल्याच्या बातम्यांना प्रसारमाध्यमांमधून समोर आल्या होत्या. त्यानंतर, ‘मानसिकदृष्टय़ा आणि आर्थिकदृष्टय़ाही मी सुस्थितीत आहे. फक्त मला मधुमेहाचा आजार आहे. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण अचानक कमी झाले तर त्याचा त्रास मला होतो. त्यादिवशीही असेच झाले होते.’, असा खुलासा माळी यांनी केला होता.  
बिग-बॉस स्टार मिंक ब्रार हिने माळी यांना त्या अवस्थेत पाहिले होते आणि त्यांची मुलगी अंतरा माळी हिच्याशी संबर्क साधला होता.
तंत्रज्ञान, संगणक आणि डिजिटल फोटोग्राफीच्या तंत्रामुळे छायाचित्रे काढण्याची गंमत, त्यातली कला लोप पावत चालली आहे, अशी खंतही जगदीश माळी यांनी व्यक्त केली होती. संगणकामुळे फोटोशॉप प्रणालीमध्ये छायाचित्रांवर विविध प्रकारचे काम करता येते, हवा तसा परिणाम मिळू शकतो. परंतु, त्यामुळे छायाचित्र काढण्यातील गंमत निघून गेली आहे, असे त्यांचे म्हणणे होते.