महापालिकांचा गृहसंकुलांना इशारा; सजावटीसाठी ज्वलनशील पदार्थ टाळण्याच्या सूचना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : अनेक बहुमजली इमारतींमध्ये अंतर्गत सजावटीसाठी मोठय़ा प्रमाणावर ज्वलनशील पदार्थाचा अनावश्यक वापर करण्यात येत असून विद्युत रचनेतही फेरफार करण्यात येत आहे. परिणामी आगीचा धोका वाढून केवळ इमारतीतील नाही तर आसपासच्या रहिवाशांच्या जीवावरही बेतू शकते. ही बाब लक्षात घेऊन अंतर्गत सजावटीसाठी ज्वलनशील पदार्थाचा वापर टाळावा, अशी सूचना करून पालिकेने आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.

मुंबईतील ‘वन अविघ्न पार्क’ या बहुमजली इमारतीला २२ ऑक्टोबर रोजी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने इशारा दिला आहे. आगीची दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या कलम ३ (१)नुसार आपल्या इमारतीत किंवा इमारतीच्या भागात आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांतील तरतुदींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित मालक वा रहिवाशांची असल्याची बाब पालिकेने लक्षात आणून दिली आहे. इमारतीतील अग्निशमन यंत्रणा उत्तम व कार्यक्षम असावी, याबाबतचे सहामाही प्रमाणपत्र वर्षांतून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये प्राप्त करणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्याची सुविधा इमारत मालक किंवा रहिवाशांना देण्यात आली आहे. हे प्रमाणपत्र वेळेवर सादर न करणारे मालक किंवा रहिवासी कारवाईस पात्र ठरतील, असा इशारा पालिकेने दिला आहे.

 अंतर्गत सजावटीसाठी ज्वलनशील पदार्थाचा वापर टाळावा. त्यावर अग्निरोधक रसायनांची प्रक्रिया करावी, मूळ अंतर्गत संरचना, अग्निसुरक्षा

यंत्रणा व विद्युत संरचनेत फेरफार करू नये. सजावटकार आणि वास्तुविशारदांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

बहुमजली इमातींमधील रहिवाशांसाठी सूचना

बहुमजली इमारतींमधील रहिवाशांनी इमारतीतील आगीच्या धोक्याची सूचना देणारी व आग विझविण्याची सर्व उपकरणे व्यवस्थितरित्या सुरू असल्याची, तसेच त्यांच्या हाताळण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असल्याची वेळोवेळी खातरजमा करावी. त्याचप्रमाणे इमारतीत बसविलेली राईझर व स्प्रिंकलर यंत्रणा कार्यान्वित आहे किंवा नाही याबाबत नियमित केल्या जाणाऱ्या अग्निसुरक्षा कवायती करताना कटाक्षाने लक्ष द्याावे, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against those who ignore fire safety ysh
First published on: 09-11-2021 at 01:36 IST