पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांचा पोलिसांना इशारा
पोलीस ठाण्याच्या हद्दीचा वाद करून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी रविवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारी अभियोक्ता आणि पोलिसांमध्ये समन्वय असणे गरजेचे असून पोलिसांच्या तपासाचा दर्जा वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रशिक्षण आणि स्टँण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टिम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
साकेत येथील ठाणे पोलीस आयुक्तालय क्रीडा संकुलावर २५ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण १४ चमू सहभागी होणार असून या स्पर्धेत फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, खो-खो अशा विविध प्रकारच्या खेळांचा समावेश असणार आहे, अशी माहिती संजीव दयाळ यांनी दिली. गुन्हा कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असला तरी तो आधी नोंदवला पाहिजे, त्यानंतर हद्द निश्चित करून वर्ग केला पाहिजे, तसा नियमच आहे. मात्र, हद्दीचा वाद करून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असेल, तर त्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे दयाळ यांनी स्पष्ट केले. बलात्कार आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ांचा तपास पोलीस उपायुक्त किंवा अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या देखरेखीखाली होणार असून चार्जशीट दाखल करण्यापूर्वी गुन्ह्य़ाचा तपास योग्य प्रकारे झाला आहे का, याची पाहणी हे अधिकारी करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पूर्वी सरकारी अभियोक्ता आणि पोलीस विभाग संलग्न होता. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दोघे वेगळे झाल्याने त्यांच्यातील समन्वय कमी झाला. त्यामुळे शिक्षेचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्या जिल्ह्य़ात किंवा शहरात महिलांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नाही, त्या ठिकाणी हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. तसेच पोलिसांची गस्त वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 महिलांनी बिनधास्तपणे तक्रारी करण्यासाठी पुढे आले पाहिजे, स्थानिक पोलिसांनी दखल घेतली नाहीतर त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असेही आवाहनही त्यांनी महिलांना केले.