विलीनीकरणाच्या मागणीसाठी ३७ आगारे बंद

मुंबई: राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण करा या मागणीसाठी मंगळवारीही राज्यातील ३७ आगारे एसटी कामगारांकडून बंद ठेवण्यात आली. दिवाळीत एसटीला मिळणारे उत्पन्न आणि या काळातही कामगारांनी माघार न घेतल्यास दिवाळीनंतर कठोर कारवाईचा बडगा उचलण्याची तयारी महामंडळाने ठेवल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मागण्यांसाठी सोमवारी ३७ आगारे बंद होती. त्यातील आठ आगारे मंगळवार सकाळपर्यंत सुरू झाली; परंतु विलीनीकरणाच्या मागणीसाठी पुन्हा नव्याने भंडारा विभागातील सहा आणि परभणी विभागातील दोन आगारांतील कामगारांनी संप पुकारला व एसटी सेवा बंद ठेवली. याशिवाय लातूर, नांदेड, परभणी, सोलापूर यांसह अन्य काही विभागांतील आगारातील सेवा कामगारांनी बंद ठेवल्या होत्या. एसटी सेवा सुरू होताच त्या अडविण्याचाही प्रयत्न होत होता. त्यामुळे प्रवासी सेवेवर काहीसा परिणाम झाला. परंतु प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने जवळच्याच आगारातूनही एसटी सेवा सुरू ठेवून प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला.

एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीत एसटी महामंडळाला चांगलेच उत्पन्न मिळते. सध्या १३ कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतही आहे. बंद असलेल्या आगारांतील एसटी कामगारांवर कारवाई के ल्यास त्याचे लोण ऐन दिवाळीत सर्वत्र पसरू शकते, असा अंदाज असल्याने दिवाळीत कोणतीही कारवाई न करण्याचीच महामंडळाची भूमिका आहे. तोपर्यंत आगारातील संपही मिटण्याची प्रतीक्षा करत आहोत. परंतु दिवाळीतही संप न मिटल्यास त्यानंतर कठोर कारवाई करण्याची तयारी ठेवल्याचे सांगितले.

एसटीला यापुढे पूर्वीसारखे उत्पन्न मिळू शकणार नाही. कारण करोनामुळे प्रवासी कमी झाले आहेत. शासनात विलीनीकरण हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. त्यामुळे या मागणीला कायम समर्थन आहे.  प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा याच मागणीला समर्थन दिले आहे.  -श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र.एस.टी कर्मचारी काँग्रेस</strong>