शिवाजी साटम, अभिनेते

वाचनाची आवड लहानपणापासूनच लागली. आम्ही तेव्हा भायखळ्यात राहायचो. घराजवळच समाज कल्याण केंद्र. तिथे खेळ झाला की काही वृत्तपत्रे, ‘चांदोबा’, ‘अमृत’ जोडीला असायचे. आईसोबत गेलो की ‘चांदोबा’ वाचून काढायचो. घरच्यांनाही वाचनाची आवड. त्यामुळे वाचनसंस्कार घडले. वृत्तपत्रे घरी होतीच. रविवार पुरवण्यांमधील लहानग्यांसाठीच्या गोष्टींनी तो दिवस बहरून जायचा. वडिलांचा शिरस्ता होता की मुलांकडून इंग्रजी वृत्तपत्रातल्या बातम्या मोठय़ाने वाचून घ्यायच्या. त्याचीही सवय लागली. शाळेजवळ एक पुस्तकांचे दुकान होते. तिथे ‘कॉमिक्स’ची पुस्तके असायची. त्यातील चित्रे पाहणे आणि कॉमिक्स चाळणे हा आमचा त्या वयातील आवडता उद्योग होता.

महर्षी दयानंद महाविद्यालयाचा मी विद्यार्थी. आमच्या महाविद्यालयात शांताबाई शेळके, केशव मेश्राम मराठी शिकवायला होते. माझा विषय इंग्रजी असला तरीही शांताबाईंच्या तासाला मी जाऊन बसायचो. त्यांचे मराठी शिकवणे आणि ऐकणे म्हणजे खरोखरच पर्वणी असायची.  महाविद्यालयाच्या ग्रंथालयातूनही पुस्तकांचे वाचन झाले. हे वाचन प्रामुख्याने इंग्रजी पुस्तकांचे होते. शिवाजी पार्क, दादर येथे तेव्हा ‘प्रभात ग्रंथालय’ होते. तेथूनही अनेक पुस्तके वाचली. एकदा का पुस्तक वाचायला हातात घेतले की वेळेचे भान राहायचे नाही.  पुस्तक  वाचूनच संपवायचो. ‘अ‍ॅडव्हेंचर्स नॉव्हेल्स’चे वाचन त्या काळात अधिक प्रमाणात झाले. जेम्स हॅडली चेसचीही पुस्तके वाचली. लिओनॉडरे द विंचीचे-अ‍ॅग्नी अ‍ॅण्ड द एक्सी (जीवनचरित्र) तसेच आयन रॅण्ड, रॉबर्ट लुडलम, लिऑन युरीस, पॉवलो कोयलो, जॉन ग्रीश्ॉम आदींच्याही पुस्तकांचे वाचन झाले.

शालेय शिक्षणाची काही वर्षे देवळाली येथे बोर्डिग स्कूलमध्ये होतो. आमच्या या शाळेत वाचन हा विषय सक्तीचा होता. केवळ पुस्तक वाचून चालायचे नाही तर वाचलेल्या पुस्तकावर निबंध लिहून द्यावा लागायचा. अशा वाचनसंस्कारातून घडत गेलो. आयुष्यावर सर्वात मोठा प्रभाव ‘रीडर्स डायजेस्ट’ या मासिकाच्या वाचनाचा झाला. आमचे काका त्याचे वर्गणीदार असल्याने घरी नियमितपणे ‘रीडर्स डायजेस्ट’ येत होते. ‘रीडर्स डायजेस्ट’च्या पहिल्या पानावर काही नामवंतांचे विचार (कोट्स) असायचे. शेवटी एक दीर्घकथा असायची. त्याशिवाय दर वर्षी ‘रीडर्स डायजेस्ट’चा प्रकाशित होणारा वार्षिक अंकही वाचला जात असे. ‘रीडर्स डायजेस्ट’च्या या वाचनाने जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी, जगण्याचे भान मिळाले. मोठमोठय़ा व्यक्तींची जीवनचरित्रे यात असायची. ती वाचून प्रेरणा तर मिळालीच पण जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि ऊर्जाही मिळाली.

सध्या माझा मित्र गिरीश रानडे यांने लिहिलेले ‘करिना कॉिलग’ हे इंग्रजी पुस्तक वाचतो आहे. ‘करिना’हे त्याच्या मोटारसायकलचे नाव असून मोटारसायकलवरून त्याने जी भन्नाट भटकंती केली त्याचे प्रवासवर्णन यात आहे. पुस्तकाची भाषा सोपी आणि इतकी ओघवती आहे की पुस्तक वाचताना आपण जणू काही त्याच्याबरोबरच मोटारसायकलवरून फिरतोय असा अनुभव येतो. काही अपवाद वगळता आत्ताच्या पिढीचे वाचन कमी होत चालले आहे. स्मार्ट भ्रमणध्वनी आणि ‘व्हॉट्स अ‍ॅप’ यापुरतेच नव्या पिढीचे वाचन मर्यादित राहिले आहे. ‘सामाजिक माध्यमे’, दूरचित्रवाहिन्या, संगणक, माहितीचे महाजाल यांचाही परिणाम वाचनावर झाला आहे. हे पाहून वाईट वाटते. मुलांना वाचनाचे वेड लागलेच पाहिजे. त्यांना जो विषय आवडतो त्या विषयांवरील पुस्तके त्यांनी वाचावीत. यातून आपोआप वाचनाची आवड निर्माण होईल. वाचनासारखा दुसरा कोणताही आनंद नाही. काळानुरूप बदलायचे असेल तर मुलांनी ‘ई-बुक’, ‘किंडल’ यांवर पुस्तकांचे वाचन करावे. पण वाचन हे झालेच पाहिजे. सर्व शाळांमधून ग्रंथालय असलेच पाहिजे. ग्रंथालयातून विद्यार्थ्यांनी एखादे पुस्तक घरी नेऊन वाचावे आणि त्यावर त्या पुस्तकात थोडक्यात काय आहे ते वहीत लिहून काढावे. प्रत्येक विद्यार्थ्यांला हे बंधनकारक केले जावे. प्रत्येक शाळेत असा उपक्रम सुरू झाला पाहिजे.

आपण जशी देवाची पूजा करतो तसे पुस्तकाचे वाचन हीसुद्धा एक प्रकारे पूजाच आहे, असे मी मानतो. पुस्तक हातात घेऊन वाचणे, चाळणे, त्याची पाने पुढे-मागे करणे यातून खूप मोठा आनंद मिळतो. पुस्तके आपल्याला कल्पनेच्या पलीकडच्या जगात घेऊन जातात. माणसाच्या आयुष्यात सुखाच्या आणि दु:खाच्या क्षणीही पुस्तके हाच त्याला मोठा आधार असतो. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर पुस्तकेच आपल्याला साथ देतात त्यामुळे पुस्तकांसारखा दुसरा कोणताही मित्र नाही.