बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयात इन्कम टॅक्सचे अधिकारी पोहोचले आहेत. अधिकाऱ्यांकडून सोनू सूदच्या कार्यालयाची पाहणी केली जात आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. सोनू सूदची नुकतीच दिल्ली सरकारच्या शाळकरी विद्यार्थीसाठीच्या अभियानासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली असून त्यानंतर काही दिवसांतच इन्कम टॅक्स विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

सोनू सूदला यावेळी राजकारणात प्रवेश करण्याच्या दृष्टीने भेट झाल्यासंबंधी विचारण्यात आलं होतं. यावेळी त्याने आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं सांगितलं होतं. आम आदमी पक्षातील नेत्यांच्या भेटीनंतर सोनू सूद राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

४८ वर्षीय सोनू सूद खऱ्या अर्थाने लॉकडाउनमुळे जास्त चर्चेत आला. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या अनेक परप्रांतीयांना सोनू सूदने त्यांच्या घऱी पोहोचवण्याचं काम केलं. इतकंच नाही तर अनेकांच्या जेवणासोबत राहण्याची, रोजगाराचीही त्याने व्यवस्था केली. लॉकडाउन काळात केलेल्या समाजकार्यामुळे सोनू सूदवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे त्याला राजकीय रंगही दिला जात होता. यामुळे त्याच्या राजकारणातील चर्चाही रंगल्या होत्या. मात्र सोनू सूदने नेहमीच या चर्चा अफवा असल्याचं सांगितलं आहे.