गेल्या दहा वर्षांमध्ये सिंचनाच्या क्षेत्रात नक्की किती वाढ झाली याबाबत उलटसुलट चर्चा होत असली तरी श्वेतपत्रिका सादर झाल्यावर हा वादाचा मुद्दा मात्र कायम राहिला आहे. काँग्रेसकडील कृषी खाते ०.१ टक्के या आकडेवारीवर ठाम असताना राष्ट्रवादीकडील जलसंपदा विभागाने ही आकडेवारी खोटी ठरवित ५.१७ टक्के सिंचन क्षेत्रात वाढ झाल्याचा युक्तिवाद केला आहे. परिणामी कोणाचे बरोबर, कोणाचे चूक हे अधांतरीच राहिले आहे.
श्वेतपत्रिकेच्या खंड दोनमध्ये १८५ प्रकल्पांचा खर्च का वाढला याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात कोणत्या खासदार-आमदाराने प्रकल्पाची व्याप्ती बदलण्याकरिता पत्रे दिली त्यांचीही नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. पण ज्याच्यावरून रामायण झाले त्यावर काहीच भाष्य करण्यात आलेले नाही.
सिंचन क्षेत्र नक्की किती वाढले या वादावर पडदा टाकण्याच्या उद्देशाने श्वेतपत्रिकेत १९९५ पासून म्हणजेच शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळापासून आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला आहे. २०००-०१ ते २०१०-११ या दहा वर्षांमध्ये सिंचनाची क्षमता १०.५६ लक्ष हेक्टर्सने वाढल्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कृषी खात्याचा दावा खोडून काढताना जलसंपदा विभागाने गेल्या दहा वर्षांमध्ये पिकाखालील स्थूल क्षेत्र हे २१६ लक्ष हेक्टर्सवरून २२६.१२ हेक्टर्स वाढल्याचा दावा केला आहे.
काँग्रेसचे सोयीस्कर मौन
सिंचनाच्या श्वेतपत्रिकेबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी योग्य वेळ साधली. एफ.डी.आय.सह विविध विधेयकांवर केंद्रात राष्ट्रवादीची मदत आवश्यक असल्याने काँग्रेसला नमविण्याची संधी पवार यांनी सोडली नाही. यामुळेच काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने पवार यांना सांभाळून घ्या, असा सल्ला राज्यातील नेत्यांना दिला. श्वेतपत्रिकेवर काँग्रेसने आक्रमक होण्याचे ठरविले होते. पण नवी दिल्लीच्या इशाऱ्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मौन बाळगण्यावर भर दिला.
केंद्र सरकारला वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे लोटांगण
सिंचन श्वेतपत्रिकेवरून मुख्यमंत्र्यांनी केलेली उलटसुलट विधाने पाहाता केंद्रातील काँग्रेसप्रणीत सरकार वाचविण्यासाठी राष्ट्रवादीसमोर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोटांगण घातले आहे. मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिकेप्रकरणी जनतेची फसवणूक केली असून हजारो कोटींच्या सिंचन घोटाळ्यांची चौकशी ‘एसआयटी’ मार्फत न केल्यास हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी दिला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2012 रोजी प्रकाशित
नक्की किती सिंचन क्षेत्र वाढले ?
गेल्या दहा वर्षांमध्ये सिंचनाच्या क्षेत्रात नक्की किती वाढ झाली याबाबत उलटसुलट चर्चा होत असली तरी श्वेतपत्रिका सादर झाल्यावर हा वादाचा मुद्दा मात्र कायम राहिला आहे. काँग्रेसकडील कृषी खाते ०.१ टक्के या आकडेवारीवर ठाम असताना राष्ट्रवादीकडील जलसंपदा विभागाने ही आकडेवारी खोटी ठरवित ५.१७ टक्के सिंचन क्षेत्रात वाढ झाल्याचा युक्तिवाद केला आहे.

First published on: 01-12-2012 at 03:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actually how much irregation area will increase