मुंबई : कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनाऱ्यांपासून विदर्भातील व्याघ्र अभयारण्यांपर्यंत नैसर्गिक वैविध्याने नटलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रातील संधी आणि भविष्यातील दिशेचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने येत्या शुक्र वारी आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन परिषदेत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग आणि इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत चटवाल आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

करोनाचा संसर्ग कमी झाल्यावर राज्यात पर्यटन व्यवसायाला चालना मिळत असतानाच, रोजगारनिर्मिती आणि महसुली उलाढालीच्या पातळीवर अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पर्यटन उद्योगाच्या पुढील वाटचालीची चर्चा पर्यटन परिषदेत होईल. पर्यटन विभाग आणि पर्यटनाच्या क्षेत्रातील व्यावसायिकांना पर्यटन क्षेत्रातील अडचणी, संधी व संभाव्य उपाययोजना यांची चर्चा होण्यासाठी एक व्यासपीठ या पर्यटन परिषदेच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राला पर्यटनाच्या जागतिक नकाशावर पुढे आणण्यासाठीच्या कल्पना या परिषदेत मांडतील. त्याचबरोबर इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत चटवाल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग, श्ॉले हॉटेल्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, फार होरायझन टुर्स प्रा. लि.चे अध्यक्ष संजय बासू, पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर, कामत हॉटेल्स समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल कामत आणि वीणा वर्ल्डचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर पाटील आदी मान्यवर या परिषदेत सहभागी होतील. करोनामुळे गेले पावणेदोन वर्षे पर्यटन व आदरातिथ्य उद्योगाला मोठा फटका बसला आहे. आता करोनाचे सावट दूर होत असल्याने दिवाळीच्या सुट्टीच्या हंगामात पर्यटनाला पुन्हा चालना मिळण्याची अपेक्षा असून पर्यटन उद्योग पुन्हा भरारी घेण्यासाठी आतुर आहे. देशातर्गत विमानसेवा आता पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती व भविष्यातील योजना याबाबतची चर्चा या परिषदेत होईल.