केद्र सरकारची विविध अनुदाने थेट बँक खात्यात जमा करण्याची महत्त्वाकांक्षी योजना येत्या १ तारखेपासून राज्यातील सहा जिल्ह्य़ांमध्ये राबविण्यात येणार असली तरी अनेक लाभार्थीकडे बँकेचे खाते वा आधार कार्डेच नसल्याने सध्या ही माहिती जमा करून बँक खाती उघडण्याकरिता शासकीय यंत्रणांची एकच धावपळ उडाली आहे.
केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना मुंबई शहर व उपनगर, पुणे, वर्धा, अमरावती आणि नंदुरबार या राज्यातील सहा जिल्ह्य़ांमध्ये पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्य़ात शुक्रवारीच या योजनेला सुरुवात करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची असल्याने अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची योजना यशस्वी करण्याकरिता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष घातले आहे. काँग्रेसला या योजनेचे श्रेय मिळणार असल्याने राष्ट्रवादीने या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. केंद्र सरकारच्या ३४ विविध योजनांचे अनुदान लाभार्थीच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मात्र अनेक लाभार्थीचे बँक खातेच नसल्याने शासकीय यंत्रणांची सध्या चांगलीच धावपळ उडाली आहे. याशिवाय या योजनेकरिता आधार कार्ड हे आवश्यक असले तरी आधार कार्ड बहुसंख्य लाभार्थीजवळ नाही. ही योजना राबविण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आधार कार्ड नसले तरी बँक खाते असल्यास अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले. मात्र लाभार्थीना लवकरात लवकर आधार कार्ड काढण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
मुंबई शहर व उपनगरात नक्की किती आधार कार्डाचे वाटप झाले ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ नाही. कारण मुंबईत आधार कार्डासाठी मुंबई महानगरपालिका ही समन्वयकाची जबाबदारी पार पाडत आहे. मुंबई शहरात २० हजार लाभार्थी असून, ९५ टक्के लाभार्थीकडे बँक खाती असल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक यांनी सांगितले. मुंबई उपनगर जिल्ह्य़ातील ३४,९०४ लाभार्थीपैकी ३१,७२५ म्हणजेच जवळपास ९० टक्के लाभार्थीची बँक खाती असल्याची माहिती मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी संजय देशमुख यांनी दिली. पुणे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्य़ातील ६० हजार लाभार्थीपैकी ८७ टक्के लाभार्थीची बँक खाती आहेत. वर्धा जिल्ह्य़ात आधार कार्डांचे ८० टक्क्य़ांपेक्षा जास्त वाटप झाले आहे. तसेच ३४ हजार लाभार्थीमध्ये बँक खाते असलेल्यांचे प्रमाण चांगले असल्याचे जिल्हाधिकारी नवीन सोना यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्य़ातील १ लाख १० हजार लाभार्थीपैकी ८० टक्के लाभार्थीकडे बँक खाती असून, उर्वरित लोकांची खाती उघडण्याचे काम महिनाभरात पूर्ण केले जाईल, असे जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल यांनी सांगितले.
सध्या लाभार्थीची बँक खाती उघडण्याची मोहिम सहाही जिल्ह्य़ांमध्ये हाती घेण्यात आली आहे. काही लाभार्थीकडे बँक खाती उघडण्याकरिता पुरेशी कागदपत्रे नसल्याने अडचणी येतात. त्यावर मार्ग काढण्यात येत आहे. बँक खाते नसल्याने अनुदानाच्या योजनेचा लाभ झाला नाही हे घडू नये म्हणून बँक खाती उघडण्याकरिता सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना तालुका पातळीवर देण्यात आल्या आहेत.      

जिल्हानिहाय लाभार्थीची संख्या
मुंबई शहर – २० हजार
मुंबई उपनगर – ३४,९०४
पुणे – ६० हजार
अमरावती – १ लाख १० हजार
वर्धा – ३४ हजार
नंदुरबार – ३० हजार