मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया शनिवारी संध्याकाळी संपुष्टात आली. या प्रवेशासाठी दिलेल्या तीन दिवसांच्या मुदतीमध्ये राज्यभरातून ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये सर्वाधिका इन हाऊस कोट्यांतर्गत २६ हजार ५२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. कोट्यांतर्गत प्रवेशासाठी १ लाख १३ हजार ४८ विद्यार्थ्यंनी अर्ज केले.
अकरावीच्या कोट्यातील प्रवेश प्रक्रियेला १२ जून रोजी सुरुवात झाली. इन हाऊस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत असलेल्या २ लाख २५ हजार ५१४ जागांसाठी राज्यभरातून १ लाख १३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते. कोट्यांतर्गत प्रवेशासाठी दिलेली तीन दिवसांची मुदत शनिवारी सायंकाळी ६ वाजता संपुष्टात आली. त्यावेळी अवघ्या ६० हजार ४८७ विद्यार्थांनी कोट्यांतर्गत प्रवेश घेतले. प्रवेशाच्या पहिल्या दिवशी संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर होण्यास उशीर झाल्याने १२ जून रोजी अवघ्या ९ हजार ८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मात्र १३ जून रोजी २४ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी तर १४ जून रोजी २६ हजार ७७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६० हजार ४८७ वर पोहचली.
कोट्यांतर्गत प्रवेशासाठी इन-हाउस कोट्यासाठी सर्वाधिक ५२ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्याखालोखाल अल्पसंख्याक कोट्यांतर्गत ३६ हजार ९९१ विद्यार्थ्यांनी आणि व्यवस्थापन कोट्यातून २३ हजार ५८९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. यामध्ये इन-हाउस कोट्यांतर्गत २६ हजार ५२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. अल्पसंख्याक कोट्यात २६ हजार २१० विद्यार्थ्यांनी आणि व्यवस्थापन कोट्यात ७ हजार ७५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. कोट्यांतर्गत १ लाख १३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले, त्यातील ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.
२ लाख २५ हजार ५१४ जागा
राज्यातील एकूण ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालये/उच्च माध्यमिक शाळांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. या संस्थांमध्ये एकूण २१ लाख २३ हजार ४० इतकी प्रवेश क्षमता आहे. त्यामधून कॅप फेरीसाठी १८ लाख ९७ हजार ५२६ जागा राखीव असून, कोटाअंतर्गत २ लाख २५ हजार ५१४ जागा उपलब्ध आहेत.