ठाणे येथील घोडबंदर भागातील शिवसेनेच्या नगरसेविका उज्ज्वला फडतरे यांनी पाळलेल्या मार्शल या रॉट्टवेईलर जातीच्या कुत्र्याला सोमवारी सकाळी एका खासगी शाळेच्या बसने धडक दिल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी संबंधित शाळेच्या दोन बसगाडय़ांची तोडफोड केली.
या अपघातात मार्शल हा दोन वर्षांचा कुत्रा गंभीर जखमी असून त्याचा जबडा तुटला आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राजकीय राडय़ांसाठी सतत चर्चेत राहिलेल्या ठाणे शहरात या घटनेमुळे नव्याने राजकारण सुरू झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत दिवसभर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू होते. ज्याच्यामुळे हा सगळा राडा सुरू झाला तो मार्शल कुत्रा सध्या रुग्णालयात सलाईनवर असून त्याच्या जबडय़ावर शस्त्रक्रियेसाठी खास पुण्यावरून पशुवैद्यकीय तज्ञांना पाचारण करण्यात येणार आहे.  
हा अपघात होताच बसचालकाने तेथून पलायन केले.  
मात्र संतप्त शिवसैनिकांनी रेन्बो शाळेच्या दोन बसगाडय़ांमधील विद्यार्थ्यांना खाली उतरविले आणि बसच्या काचा फोडल्या. फडतरे यांनी मात्र या घटनेचा इन्कार केला असून, हा प्रकार घडला त्यावेळी मी आणि माझा मुलगा नीलेश दोघे रुग्णालयात होतो. तसेच शिवसैनिकांनी हा प्रकार केलेला नाही.  असा दावा त्यांनी यावेळी केला.  दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. चौकशीनंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. चौधरी यांनी सांगितले.
पाळीव कुत्र्यावरून राजकारण
 या अपघातावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पुन्हा एकदा संषर्घ सुरू झाला असून, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान आणि नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या दबावामुळे रेन्बो शाळेच्या बस तोडफोडप्रकरणी आपला मुलगा नीलेश आणि शिवसैनिकांविरोधात कापुरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत आहे, असा आरोप फडतरे यांनी केला.