संक्रमण शिबीरात दोन-दोन पिढय़ा गेल्या तरी हक्काचे घर काही मिळत नाही, हीच भायखळा, सातरस्ता, ताडदेव इत्यादी ठिकाणच्या धोकादायक इमारतींमधून विस्थापित झालेल्या अनेक कुटुंबांची खंत आहे. संक्रमण शिबिरात राहावयास आलो तेव्हा मुले लहान होती आणि आता मुले मोठी झाली, त्यांची लग्ने झाली आणि आता नातवंडेही झाली. तरीही हक्काचे घर अद्याप मिळालेले नाही, अशीच व्यथा यापैकी अनेकांनी बोलून दाखविली.
भायखळ्याच्या कुंजविहारमधील चाळकऱ्यांची हीच व्यथा शिल्पा कदम यांनी मांडली.
कुर्ला पूर्व येथील संक्रमण शिबिरामध्ये त्यांच्या किमान दोन पिढय़ा गेल्या आहेत. कुंजविहार चाळ रस्ता रूंदीकरणात गेली. त्यामुळे १९९१ च्या दरम्यान तेथील रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात आले. शिल्पा कदम यांचा मुलगा त्यावेळी चौथीमध्ये शिकत होता. आता त्याचे लग्न झाले असून त्याला मुलगा झाला आहे. पण अद्याप घराचा पत्ता नाही. कुंजविहार चाळीतील अनेक कुटुंबीयांची तीच स्थिती आहे.
१८० चौरस फुटाच्या घरात हे कुटुंब राहते आहे. कुंजविहारमधील आणखी सात-आठ कुटुंबांची अशीच अवस्था आहे. त्याच चाळीतील मीलन मुणगेकर यांची मुले संक्रण शिबिरातच लहानाची मोठी झाली आहेत. लक्ष्मीबाई रघुनाथ काजवे यांना नातवंडे झाली. त्यांना संक्रमण शिबिरातील पडकी-सडकी खोलीच आपले घर वाटते.
म्हाडाच्या सांगण्यावरुन चाळी रिकाम्या केल्या, त्या तोडल्या, परंतु अजून नवी घरे बांधलीच नाहीत. संक्रमण शिबिरातील रहिवाशांच्या व्यथा म्हाडा ऐकायलाही तयार नाही, अशा त्यांच्या तक्रारी आहेत. अशी अनेक कुटुंबीय संक्रमण शिबिरातून आढळतात.
फक्त प्रतीक्षाच!
म्हाडाच्या संक्रमण शिबिरापैंकी सर्वात जुने संक्रमण शिबीर म्हणजे शीव येथील प्रतीक्षा नगर. बैठय़ा चाळी असलेल्या या शिबिरामध्ये १९७६ पासून मुंबईच्या अनेक भागातून लोक राहण्यास आले आहेत. अनेक पिढय़ा येथे जन्माला आल्या आणि शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहत येथून बाहेर पडल्या. काही कुटुंबांची नावे म्हाडाच्या बृहत यादीमध्ये आली खरी पण नेमके हे लोक कोण हे कोणालाच कळले नाही.
२००५ च्या अतिवृष्टीनंतर काही बैठया चाळी तोडून त्या जागेवर इमारती बांधल्या. काही रहिवाशांना तेथे स्थलांतरीत करण्यात आले. आडव्या चाळीतून, उभ्या चाळीत हे लोक रयाला गेले, परंतु ते हक्काचे घर नव्हे, तर संक्रण शिबीरच आहे. विशेष म्हणजे या संक्रण शिबिराच्या जागेवर म्हडाने वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी इमारती बांधल्या आणि वारेमाप पैसा मिळवला. बाहेरचे लोक येथे घरे घेऊन स्थिरस्थावर झाले, संक्रण शिबिरातील रहिवाशांची मात्र अजून अस्थिरताही संपली नाही आणि आपल्या हक्काच्या मूळ घराची प्रतिक्षाही.