तापमान घटल्याने वातावरणस्थिती सर्दी-खोकल्यास पोषक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसेंदिवस ढासळत जाणाऱ्या हवेच्या पातळीमुळे यंदाच्या थंडीत झालेला सर्दी आणि खोकला लवकर बरा होत नसल्याचे दिसून येत असताना वाढते धुके आणि तापमानातील घट यांमुळे बुधवारी मुंबईतील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली.  ‘सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टींग अ‍ॅण्ड रिसर्च’च्या (सफर) आकडय़ांनुसार मुंबईतील सर्वसाधारण हवेच्या गुणवत्तेची पातळी ही ‘वाईट’ या स्तरापर्यंत नोंदविण्यात आली. शिवाय ‘सफर’ कडून जाहीर करण्यात येणाऱ्या मुंबईतील विभागीय हवेची प्रतही निराशाजनक असल्याचे दिसले.  आरोग्यास हानीकारक असणाऱ्या ‘अत्यंत वाईट’ या स्तरामध्ये हवेची गुणवत्ता बुधवारी होती.

मुंबईतील सांताक्रूझ येथे १४.१ अंश सेल्सियस अशी या ऋतूतील सर्वात कमी तापमानाची नोंद होती. याशिवाय मुंबईवरील धुक्याची चादरही कायम आहे. त्यामुळे शहराच्या प्रदूषणातही वाढ झाली आहे. उन्हाळ्यातील उष्ण हवा हलकी असल्याने तिच्यात मिसळलेले प्रदूषित घटक हवेसोबत उंचावर जातात व प्रदूषणाचे प्रमाण कमी होते. याऊलट  हिवाळा सुरु झाल्यापासून वातावरणात रात्रीच्या वेळी तयार होणाऱ्या धुक्याने आणि मंदावणाऱ्या हवेच्या वेगामुळे प्रदूषण करण्याची क्षमता अधिक असणारे ‘पीएम २.५’ व ‘पीएम १०’ हे प्रदूषित कण जमिनीलगतच अडकून राहतात. त्यामुळे सकाळी असणाऱ्या  ‘समाधानकारक’ स्तरापासून रात्री ‘अत्यंत वाईट’ या स्तरापर्यंत शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत असल्याचे ‘सफर’च्या निरीक्षणानुसार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बुधवारी शहरात हवेची गुणवत्ता ढासळली होती.

आकडय़ांच्या भाषेत..

प्रदूषित वायूंची आणि दुषित कणांची उपस्थितीवरुन हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक काढण्याचे काम ‘सफर’ ही प्रदूषणमापक यंत्रणा करते. हा निर्देशांक १०० या प्रमाणित एकाकात (एअर क्वॉलिटी इंडेक्स)रुपांतरित करुन १०० पर्यंत ‘चांगली’, १०० ते २०० ‘समाधानकारक’, २०० ते ३०० ‘वाईट’, ३०० ते ४०० ‘अत्यंत वाईट’, ४०० ते ५०० पर्यंत ‘धोकादायक ’ या स्तरांवर मांडण्यात येतो. बुधवारी ‘सफर’ने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार मुंबईच्या सर्वसाधारण हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हा २३८ म्हणजे ‘वाईट’ या स्तरावर पोहचला होता. शिवाय कुलाबा (३२७), वांद्रे-कुर्ला संकुल (३१५), अंधेरी (३०३), माझगाव (३१०) याठिकाणी ‘अत्यंत वाईट’ या स्तरापर्यंत हवेची गुणवत्ता ढासळ्याची नोंद ‘सफर’ने केली होती. या विभागात गुरुवारी देखील हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाजही ‘सफर’ने यावेळी वर्तवला आहे.

निरीक्षणात काय?

बुधवारी मुंबईतील हवेचा गुणवत्तानिर्देशांक आरोग्यास हानीकारक अवस्थेपर्यंत पोहोचला होता. कुलाबा, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, माझगाव ही सर्वात वाईट हवा असलेली ठिकाणे होती. गेल्या काही दिवसांपासून सर्दी आणि खोकल्यावर विविध औषधांची मात्रा का लागू होत नाही, याचा नागरिकांना उलगडा होत नाही. त्याचा संबंध थेट हवेच्या ढासळत्या गुणवत्तेशी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air pollution in mumbai
First published on: 04-01-2018 at 02:12 IST