“राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईच्या पर्यटनासाठी ५०० कोटी रुपये आणि पर्यटन खात्याकरीता १ हजार कोटी अधिकची तरतुद केली आहे. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर चालते. आपल्या देशामध्ये सुद्धा राजस्थान, केरळ, गोवा अशा राज्यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. पर्यटन क्षेत्रात शासनाच्या बरोबरीने खासगी गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला पाहिजे. पर्यटन आपला इतिहास, संस्कृती आहे,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

“पर्यटन क्षेत्रामध्ये अमर्याद अशी संधी उपलब्ध आहे. जे-जे प्रस्ताव आदित्य ठाकरे आणि अदिती तटकरे यांनी आणले त्या सगळ्या प्रस्तावांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याचे अजित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, मी पण बरेच वर्ष समाजकारण, राजकारण कराणारा कार्यकर्ता आहे. १९९१ -९२ ला मला राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. या सर्व गोष्टींना तीस वर्षे उलटले आहेत. आमच्या पाठीमागचा इतिहास बघितला तर पर्यटन खाते ज्यांच्याकडे असायचं निधी कमी असायचा पण शेवटच्या मार्च एंडला त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात आणि मतदारसंघातचं सगळे पैसे जायचे. तुम्ही हे तपासून पाहू शकता. आम्हाला हे कळायचचं नाही हे काय चाललं, या पद्धतीच्या घटना घडायच्या,” असे अजित पवार म्हणाले.

अन् मुख्यमंत्र्यांच्या पुढं आमचं काही चालत नाही – अजित पवार

चिपी विमानतळावर पुस्तक लिहायला पाहिजे

“सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं कांम आता पुर्ण झालंय. या चिपी विमानतळावर आता एक पुस्तकचं लिहायला पाहिजे, किती टर्म चिपी चिपी चाललं. पण चिपी काही पुर्ण होईना. दरम्यान, मुंबई ते सिंधदुर्ग विमानसेवा ९ तारखेला सुरु होत आहे. आम्ही पण मुख्यमंत्र्याबरोबर जात आहोत. आताच त्यांना सांगितल विमानात मला जागा ठेवा.” अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली. ते म्हणाले विमानसेवेचा फायदा कोकणच्या पर्यटन वाढीस होईल. गोव्याकडे जाणारे पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात कोकणाकडे वळतील.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद

जग फिरण्याआधी महाराष्ट्र फिरा

अनेकजण देश-विदेशात फिरुन आलेले आहेत. परंतू अनेकांनी महाराष्ट्र अजून निट बघितलेला नाही. जग फिरण्याआधी पहिल्यांदा आपला महाराष्ट्र फिरला पाहीजे. आपली पर्यटन स्थळ बघितली पाहीजे. त्यानंतर जग बघायला बाहेर पडायला पाहीजे, असे आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

शिवसेना विरुद्ध राणेवादाचा पुढील अंक

कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणाऱ्या आणि विकासाला चालना देणाऱ्या सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी दिली होती. दुसरीकडे, केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनीही उद्घाटनाची घोषणा करताना मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीची आवश्यकता नाही, असा दावा केला. त्यावर कुरघोडी म्हणून राणे यांच्यासह इतर नावांचा निमंत्रणाकरिता विचार झालेला नाही, असे देसाई यांनी सांगितल्याने शिवसेना विरुद्ध राणेवादाचा पुढील अंक विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात बघायला मिळण्याची चिन्हे आहेत.