राज्यातील काँग्रेस नेत्यांमधील कलगीतुऱ्यामुळे रखडलेला काँग्रेस मंत्रिमंडळाच्या विस्ताराची प्रक्रिया अखेर पार पडली. राजभवनात आज(सोमवार) सकाळी ९.३० वाजता काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे सुपूत्र अमित देशमुख यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. दरम्यान अमित देशमुख यांच्या शपथविधीसाठी सर्व देशमुख कुटुंबीय राजभवनात उपस्थित होते.
लोकसभेतील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवायचे असल्यास आपल्याला मुक्त वाव द्यावा ही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका असतानाही पक्षातील अन्य बडे नेते त्यांच्या विरोधात एकवटल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत होते. मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील या नाराजीमुळे काँग्रेस मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा अनेक दिवसांपासून रखडलेला होता. मात्र, रविवारी रात्री उशिरा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस मंत्रिमंडळाच्या विस्ताराला परवानगी दिल्याचे समजते.  पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयामुळे आगामी विधानसभा निवडणुका पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मंत्रिमंडळातील नव्या नियुक्त्यांबाबत एकवाक्यता होऊ न शकल्यामुळे रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेला शपथविधी समारंभ लांबणीवर टाकण्याची नामुष्की सरकारला सहन करावी लागली होती. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची योजना राज्य सरकारची होती. लोकसभेत झालेल्या दारुण पराभवामुळे विधानसभेत चांगले यश मिळवायचे असल्यास बडय़ा मंत्र्यांना हात लावण्याची मुख्यमंत्र्यांची योजना आहे. नारायण राणे, डॉ. पतंगराव कदम यांच्यावर पक्षकार्याची जबाबदारी देण्याची योजना त्यांनी सोनिया गांधी यांच्याजवळ मांडली. विधानसभेत यश मिळवायचे असल्यास नेतृत्व बदलाची मुख्यमंत्री विरोधकांची मागणी असली तरी ती मान्य करण्यास दिल्लीतूनच नकार देण्यात आला. मात्र, मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे मुक्त वाव देण्यासही साऱ्या नेत्यांचा विरोध आहे. यातूनच राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे आणि राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे याचा घोळ झाला.मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सायंकाळी चार वाजता करण्याचे ठरले होते. त्यानुसार राजशिष्टाचार विभागाने निमंत्रक पत्रिका छापण्याची तयारी केली होती. मात्र, काँग्रेस नेत्यांमध्ये आपापसांत रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे हा प्रयत्न सपशेल फसला होता. दरम्यान सोमवारी विस्तार न झाल्यास चुकीचा संदेश जाईल, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे होते. अधिवेशनानंतर विस्तार करून काय साधणार, असाही काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.

अशोक चव्हाण आक्रमक, राणे नाराज
राज्यात पक्षाची लाज राखल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे दिल्लीदरबारी वजन वाढले. मंत्रिमंडळात  सत्तार, बागवे वा वडेट्टीवार यांच्या नावांचा विचार व्हावा, अशी शिफारस त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीसाठी राज्याच्या प्रचार समितीचे अध्यक्षपद अशोक चव्हाण यांच्याकडे जाण्याची चिन्हे आहेत. त्याला पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोध आहे. मंत्रिमंडळातून आपल्याला वगळावे, अशी भूमिका मुख्यमंत्री मांडत असल्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीला का उपस्थित राहायचे, अशी भूमिका घेत नारायण राणे यांनी रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे टाळले.