प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकं आढळून आल्याच्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता दिसत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने कारवाई करत इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख तेहसीन अख्तर याच्याकडून दोन मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत. तेहसीन सध्या तिहार कारागृहामध्ये आहे.

तेहसीन याच्याकडे सापडलेले दोन्ही फोन आपलेच असल्याची कबुली त्याने दिली आहे, मात्र, त्याच्यावरुन अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याबद्दलचे मेसेज आपण पाठवले नसल्याचं त्याने सांगितलं आहे. हे संदेश टेलिग्राम अॅपवरुन पाठवण्यात आलेल्या या संदेशांमधून कळत आहे की, अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेची आहे.

दिल्ली पोलिसांच्या लोधी कॉलनी इथे असलेल्या विशेष पोलीस दलाच्या कार्यालयातून राष्ट्रीय तपास यंत्रणेने हे मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, तपास यंत्रणा मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात पुरावे शोधत आहे. त्यानंतर त्याच्या अटकेसाठी परवानगी मागितली जाईल.

२०१३ मध्ये जेव्हा इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक यासिन भटकळ याला अटक झाली, त्यानंतर तेहसीन अख्तर याने या संघटनेचं प्रमुखपद स्वीकारलं. २०११ मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यातल्या आरोपींपैकी तो एक आहे. दिल्ली पोलिसांसह तिहार कारागृहाच्या अधिकाऱ्यांना तेहसीन याच्या कोठडीतून ११ मार्च रोजी हे दोन फोन मिळाले होते. तो हे दोन्ही फोन ऑक्टोबरपासून वापरत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पण हे दोन्ही फोन त्याच्या कोठडीत कसे आणि कधी गेले याबाबत मात्र अजून काही हाती लागलेलं नाही.

काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर एका गाडीमध्ये काही स्फोटकं आढळली होती. या प्रकरणात आत्तापर्यंत काही पोलीस अधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे. यामध्ये सचिन वाझे, रियाझ काझी, सुनील माने, माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त संतोष शेलार, आनंद जाधव, नरेश गौर, मनिष सोनी आणि सतिश मोथकुरी हे देखील अटकेत आहेत.