गेल्या पाच महिन्यांपासून तुरूंगात असेलली अमृता साळवी अखेर मंगळवारी संध्याकाळी तुरुंगातून बाहेर आली आहे. परिस्थितीमुळे स्वत:चे तान्हे मूल विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिला सप्टेंबर महिन्यात अटक झाली होती.
मालवणी येथे राहणारी २१ वर्षीय अमृता साळवी उर्फ आफरिन शेख या विवाहीत तरुणीला तीन मुलांसह पतीने घराबाहेर काढले होते. आत्यंतिक गरिबी, कुणाचा आधार नाही यामुळे हवालदिल झालेल्या अमृताला दोन दलाल महिलांनी आश्रय दिला आणि तिचे ४५ दिवसांचे तान्हे मूल विकण्यास प्रवृत्त केले. आपल्या एका मुलाचा नीट सांभाळ होईल म्हणून ती एक मूल संस्थेला देण्यास तयार झाली होती. परंतु दलालांनी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिचे मूल विकण्याचा प्रयत्न केला होता. ही माहिती मिळताच ‘लोकसत्ता’ ने पोलिसांच्या मदतीने सापळा लावून हा प्रकार हाणून पाडला होता. चारकोप पोलिसांनी या प्रकरणी दोन दलाल महिलांसह अमृतालाही अटक केली होती.
चारकोप पोलिसांनी या प्रकरणी वेश्याव्यवसायासाठी मूल विकण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केल्याने अमृता तुरूंगात अडकली होती तर तिची तिन्ही मुले तिच्यापासून दुरावली होती. त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्यां आणि वकील असलेल्या अ‍ॅड. अभया घनश्याम सोनावणे यांनी अमृतासाठी लढा सुरू केला. दोन महिन्यांपूर्वी अमृताला जामिनही मिळाला होता. पण २० हजार रुपयांची हमी देण्यासाठी कुणी नसल्याने दोन महिन्यांपासून ती तुरुंगात खितपत पडली होती. ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यावर अनेकांनी तिला मदत देऊ केली होती.
अखेर अ‍ॅड. सोनावणे यांनी सत्र न्यायालयात जाऊन अमृताचा जामिन करुन १० हजार इतका कमी करून घेतला. कांदिवली येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते पोपटराव घनवट यांनी मंगळवारी न्यायालयात जाऊन जामिनाची रक्कम भरून अमृताला जामिन दिला आणि तिला तिच्या आईकडे पाठवले.
 अमृताचे तान्हे बाळ आणि इतर दोन लहान मुले सुधारगृहात असून आता तांत्रिक सोपस्कार पूर्ण केल्यानंतर ती आपल्या मुलांना भेटू शकणार आहे. तिच्या पुनर्वसनासाठी अनेक संस्था पुढे आल्या असून योग्य ठिकाणी तिचे पुनर्वसन तसेच मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाणार असल्याचे अ‍ॅड. सोनावणे यांनी सांगितले