डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवरील वर्चास्वावरुन आता एका नव्याच संघर्षांला सुरुवात झाली आहे. सोमवारी रिपब्लिकन सेनेच्या सुमारे ४०० ते ५०० कार्यर्त्यांनी अचानकपणे फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्याला वेढा घातला. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद अशा घोषणा सुरु असतानाच आनंदराज आंबेडकर यांनी सोसायटीच्या कार्यालयात प्रवेश केला. तेथे विश्वस्तांच्या बैठकीत त्यांना संस्थेचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. संस्थेच्या सात पैकी चार कार्यकारी सदस्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा आनंदराज यांचा दावा आहे.
गेल्या वर्षी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पीपल्सचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आठवले समर्थकांनी त्यांना सोसायटीच्या कार्यालयात प्रवेश करताना रोखले. त्यावरुन आंबेडकर व आठवले समर्थक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. त्यानंतर आंबेडकर यांनी कायदेशीर लढाई सुरु केली.
अलीकडच्या काळात पीपल्सवर रामदास आठवले यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांचे खास समर्थक अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकर यांना बसविले होते. गेल्या वर्षी जूनमध्ये शेगावकर यांच्या अकाली निधनानंतर आठवले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्या निवडीलाच आव्हान देत आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी अचानकपणे सोसायटीच्या कार्यालयात जाऊन अध्यक्षपदाचा ताबा घेतला. रिपब्लिकन सेनेच्या वतीने सोमवारी सकाळी आझाद मैदानावर निदर्शने करण्यात आली. तेथे सुमारे एक हजार कार्यकर्ते जमले होते. साडेबाराच्या दरम्यान  ४०० ते ५०० कार्यकर्त्यांनी थेट सिद्धार्थ महाविद्यालयाला वेढा दिला. काही कार्यकर्ते महाविद्यालयात घुसले. दरम्यान पोलिसांचा फौजफाटाही तेथे दाखल झाला. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरु असतानाच आनंदराज आंबेडकर तेथे आले व त्यांनी थेट सोसायटीच्या कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर संस्थेचे एक विश्वस्त व्ही.एम. प्रधान यांच्या पुढाकाराने पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत आनंदराज यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले, अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ निकाळजे यांनी दिली.
आनंदराज यांच्या अध्यक्षतेखाली नवे कार्यकारी मंडळही या वेळी जाहीर करण्यात आले. त्यात अ‍ॅड. संघराज रुपवते, भंते संघबोधी, व्ही.एम. प्रधान, भीमराव सोनावणे आदींचा समावेश आहे. सोसायटीच्या पूर्वीच्या सातपैकी चार कार्यकारी सदस्यांचा आनंदराज यांना पाठिंबा असलेले पत्र या पूर्वीच धर्मादाय आयुक्तांना देण्यात आल्याचे निकाळजे यांनी सांगितले. रामदास आठवले सध्या उत्तर प्रदेशात असल्याने या नव्या घडामोडीवरील त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.