तिचे अश्रू थांबत नव्हते.लोक तिला आवरण्याचा प्रयत्न करत होते.तिच्या लाडक्या मुलीचे पार्थिव जेव्हा घरातून बाहेर नेले तेव्हा ती शोकमग्न अवस्थेत हंबरडा फोडत बाहेर आली. जड अंत:करणाने काही पावलं चालली.पायल..कमालीच्या दु:खावेगाने ती ओरडली आणि काही क्षणात खाली कोसळून बेशुद्ध पडली..एका शोकमग्न आईची ही केविलवाणी अवस्था पाहून उपस्थित साऱ्यांचे डोळे पाणावले..
चेतना महाविद्यालयात आपल्याच आततायी मित्राच्या क्रूर चाकू हल्ल्याला बळी पडलेल्या पायल हिच्या मृतदेहाचे सायन रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास तिचा मृतदेह सांताक्रुझ येथील तिच्या मामांच्या निवासस्थानी आणण्यात आला. येथील प्रभात कॉलनीत तिचे बालपण गेले. तिच्या निधनाचे वृत्त पसरताच प्रभात कॉलनीवर शोककळा पसरली होती. शनिवारपासूनच या भागाच चिंता आणि तणावाचे वातावरण होते. या भागातली दुकाने लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केली होती. तर जागोजागी शोकसंदेशाचे फलक लावण्यात आले होते. परिसरातले शेकडो नागरीक तिच्या अंत्ययात्रेसाठी उपस्थित होते. पायलला लहान भाऊ आहे. पायलचे नातेवाईक बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. पण एक निष्पाप जीव गेल्याबद्दल सारेजण हळहळ व्यक्त करत होते. याच गल्लीतून दररोज महाविद्यालयात जाताना पाहणाऱ्या पायलची अंत्ययात्रा आज पहावी लागेल, यावर विश्वास बसत नसल्याचे एका रहिवाशाने सांगितले.