१९ एप्रिलपर्यंत अंधेरीच्या चित्रकूट मैदानात प्रदर्शन
प्राणी-पक्ष्यांवर नितांत प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी अंधेरीच्या चित्रकूट मैदानावर गर्दी करण्याचे कारण आहे प्राणी-पक्ष्यांच्या प्रदर्शनाचे. मात्र या प्रदर्शनापेक्षा या जागेला प्राण्यांच्या जत्रेचे रूप आले आहे. प्राणी तुम्हाला तुमच्यातील माणुसकी जपायला शिकवितात असे मानणाऱ्या ‘बबलूझ झोरांग’ या संस्थेने वेगवेगळ्या देशांतील प्राणी व पक्ष्यांना जमवून मुंबईकरांसाठी प्राण्यांच्या जत्रेत सहभागी होण्याची एक संधीच मिळवून दिली आहे.
या पक्षी आणि प्राण्यांच्या जत्रेत साधारण पोपटांच्या ३८ प्रजातींमधील १०० हून अधिक जाती आहेत. अनेक पक्ष्यांमध्ये कोकाटू हा पक्षी दीड फुटाचा आणि मूळचा ऑस्ट्रेलियाचा आहे, तर जगातील दुसऱ्या क्रमांकावरील उंच असलेला इमु हा पक्षीही या प्रदर्शनात पाहायला मिळेल.
सन कोनूर स्टटस, आफ्रिकन ग्रे, ब्लू अ‍ॅण्ड गोल्ड मकाव, ग्रीन विंग्ज मकाव, सेनेगल पॅरेट, रोज ब्रीस्टेड कोकाटू, डबल यलो हेडेड अ‍ॅमेझॉन, सोलोमन आयलंड एक्लेटस यांसारखे अनेक पक्षी प्रदर्शनात पाहायला मिळतील. या प्रदर्शनात प्राणी आणि पक्ष्यांबरोबरच वेगवेगळ्या जातींचे मासे, श्वानांचे वेगवेगळे प्रकार, रंगीबेरंगी कोंबडय़ाही पाहता येणार आहे. येथे वेगवेगळ्या रंगांच्या माशांच्या २० ते २५ जाती आहेत. सुरक्षिततेसाठी या प्राणी-पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे, मात्र पिंजऱ्यातून तुम्ही या प्राणी-पक्ष्यांना मनसोक्त पाहू शकता. त्याचबरोबर या जत्रेमध्ये चायनीज शेळीही पाहायला मिळणार आहे, तर छोटय़ा आकाराचे दोन घोडे तुमचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. पांढरीशुभ्र गुबगुबीत पर्शियन मांजरीला पाहण्यासाठी तर लहानग्यांची गर्दी जमा होत आहे.
या प्रदर्शनातील प्रत्येक प्राणी-पक्ष्यांच्या पिंजऱ्याशेजारी माहिती सांगणारे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चाहत्यांना देशातील वेगवेगळ्या प्राणी-पक्ष्यांच्या जातींबद्दल माहिती घेता येईल. त्याबरोबर या प्रदर्शनात पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शनही करीत असल्याचे या आयोजक लौकिक सोमण यांनी सांगितले. गेली चार वर्षे लौकिक हा उपक्रम राबवीत असून पक्ष्यांच्या प्रेमाखातर या प्रदर्शनाचे आयोजन करीत आहेत.
प्राण्यांना आपली भाषा कळत नसली तरी ते तुम्हाला खूप काही शिकवतात. प्राणी आपल्याला माणुसकी जपायला शिकवीत असल्याचे लौकिक यांनी सांगितले. हे प्रदर्शन १९ एप्रिलपर्यंत अंधेरीच्या चित्रकूट मैदानात आयोजित करण्यात आले आहे.