श्वान, मांजरांच्या आरोग्याला फटका; प्राणीप्रेमी संघटनांच्या मदतीने पाळीव प्राण्यांसाठी मदत

मानवी समाजात रक्तदानाचे महत्त्व पटल्याने जागोजागी रक्तपेढय़ा रूजू लागल्या आहेत. मात्र, मुके जीव या व्यवस्थेला अजूनही पारखे आहेत. अपघातात जखमी झालेले श्वान, मांजरी किंवा अन्य पाळीव प्राण्यांवरील शस्त्रक्रिया किंवा उपचार यांसाठी निर्माण होणारी गरज भागवण्यासाठी मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात रक्तपेढय़ाच नाहीत. त्यामुळे अनेकदा रक्ताअभावी या प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. काही ठिकाणी डॉक्टर, प्राणीप्रेमी संघटनांच्या मदतीने समाजमाध्यमांतून अशा रक्ताचा शोध घेतला जातो. मात्र, इतर वेळी हे मुके जीव वाऱ्यावर असल्यासारखी परिस्थिती आहे.

हिमोग्लाबिनची कमतरता, मूत्रपिंड निकामी होणे, भाजणे या आजारांमध्ये श्वानांना रक्ताची गरज भासते. तर रक्ताशी संबंधित आजार आणि अपघातात रक्तस्त्राव झाल्यामुळेही श्वान आणि मांजरींना रक्त आवश्यक असते. मात्र स्वत:कडील श्वानाचे रक्तदान करण्यासाठी लोक पुढे येत नाहीत. कारण पाळीव प्राण्यांचे रक्तदान ही संकल्पनाच रूजली नाही. त्यामुळे रक्तदाता शोधणे कठीण होते.

रक्ताची गरज असणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढत असून तात्काळ रक्त मिळणे कठीण होते, असे दहिसर येथील डॉ. किशोर बाटवे यांनी सांगितले.

मुंबईतील परळच्या ‘बाई साखराबाई दिनशॉ पेटीट’ या रूग्णालयात काही वर्षांपूर्वी श्वान आणि मांजरींसाठी सुसज्ज रक्तपेढी उपलब्ध होती. मात्र कालांतराने ती बंद करण्यात आली. आठवडय़ाला एक किंवा दोन श्वानांसाठी रक्ताची मागणी येत असल्यामुळे रक्तपेढी बंद करण्यात आली असल्याचे रूग्णालयाचे प्रमुख निवृत्त कर्नल के.सी.खन्ना यांनी सांगितले.

सहा महिन्यांहून अधिक काळ रक्त साठवून ठेवणे असुरक्षित असल्यामुळे रूग्णालयातील बेवारस मात्र शारिरीकदृष्टय़ा बळकट श्वानांच्या रक्तगटाची विभागणी करण्यात आली आहे. मात्र अधिकतर कुटुंब आपल्या श्वानासाठी खाजगी श्वानाच्या रक्ताची मागणी करतात.

श्वानांमध्ये ‘अ’, ‘ब’, ‘ओ’ असे रक्तगट असतात. श्वानाच्या शरीरातून २५० मिली रक्त काढले जाते. पहिल्यांना रक्तगटाची जुळणी न करता रक्त घेता येऊ शकते मात्र दुसऱ्यांदा रक्त देताना रक्तगट जुळवणे आवश्यक असते, असे डॉ. बाटवे यांनी सांगितले. रक्त देण्याची प्रक्रिया साधारण ५०० रूपयांपासून ते २ हजार रूपयांपर्यंत जाते.

मुंबईत प्राण्यांसाठी सुसज्ज रक्तपेढीची आवश्यकता आहे. अपघातात अधिक रक्तस्त्राव झाल्यास, मूत्रपिंडाचे आजार आणि अशक्तपणा असेल तर श्वान आणि मांजर यांना रक्ताची गरज असते असे ‘पॉझ’ (प्लांट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेलफेअर) या संघटनेच्या वतीने सांगितले.

भटक्या श्वानांकडून रक्तदानाचे सत्कार्य

कांदीवलीच्या भुजू भंडारे यांच्याकडे १२ ते १५ श्वान आणि ४ ते ५ मांजरी आहेत. त्यांच्याकडील ४ श्वान रक्तदानासाठी पाठविले जातात. दर सहा महिन्यांनी आमचे श्वान रक्तदान करतात. अनेकदा भटक्या श्वानांनी दिलेले रक्त परदेशी जातीच्या श्वानांना देण्यास त्यांचे कुटुंबिय विरोध करतात. भटक्या श्वानांचे रक्त या श्वानांना जुळणार नाही या मानसिकतेतून भटक्या श्वानांचे रक्त स्वीकारण्यास मनाई केली जाते असे भंडारे यांनी सांगितले.