‘लोकसत्ता दुर्गा’ पुरस्कारासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन
मुंबई : विविध क्षेत्रांत उत्तुंग आणि समाजाभिमुख कार्यामुळे असामान्य ठरणाऱ्या, सामान्य नागरिकांमधील नऊ ‘दुर्गा’चा ‘लोकसत्ता’तर्फे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही गौरव करण्यात येणार आहे. यंदा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार- २०२१’ चे आठवे वर्ष असून आपल्या परिसरातील अशा कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती ‘लोकसत्ता’कडे पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.




अनेक स्त्रिया छोटय़ा स्वरूपात एखादे विधायक कार्य सुरू करतात आणि पुढे त्याचा विस्तार वाढून मोठे रचनात्मक काम उभे राहते. मग ते एखाद्या क्षेत्रात गाजवलेले असीम, वैयक्तिक कर्तृत्व असो किं वा सामाजिक कार्य असो, अनेक स्त्री-पुरुषांना प्रेरणा देणाऱ्या अशा नऊ स्त्रियांची माहिती ‘लोकसत्ता दुर्गा’ या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी प्रसिद्ध केली जाते. गेली सात वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमातील ६३ ‘दुर्गा’ची माहिती एकत्रितपणे नुकतीच कॉफी टेबल बुकच्या स्वरूपातही प्रसिद्ध करण्यात आली.
यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा-२०२१’ साठी नामांकने पाठवण्याचे आवाहन करण्यात येत असून २० सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठवल्या जाणाऱ्या नामांकनांमधून तज्ज्ञ परीक्षकांतर्फे नऊ स्त्रियांची या पुरस्कारासाठी निवड के ली जाणार आहे.
हे महत्त्वाचे.. उद्योग, शिक्षण, संशोधन, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, क्रीडा, मनोरंजन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक कार्य किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो, त्यात कर्तृत्व दाखवलेल्या तुमच्या परिचयातील ‘दुर्गे’ची माहिती आपण पुरस्कारासाठी पाठवू शकता. ही माहिती मराठीत आणि नोंदी स्वरूपात फक्त एकदाच पाठवावी. या स्त्रियांचे काम प्रेरणादायी, विधायक, समाजावर सकारात्मक परिणाम करणारे आणि त्या-त्या क्षेत्रात उच्च स्थानी पोहोचलेले असावे.
माहिती कुठे पाठवाल? माहिती loksattanavdurga@gmail.com
या ई-मेल आयडीवर वा टपालाने पुढील पत्त्यावर पाठवावी. ‘लोकसत्ता- महापे कार्यालय, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१०’. ई-मेलमध्ये आणि टपालाने पाठवल्या जाणाऱ्या पाकिटांवर ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’साठी असा ठळक उल्लेख करावा. पुरस्कारप्राप्त दुर्गाची माहिती थेट ‘लोकसत्ता’मध्ये ७ ऑक्टोबरपासून प्रसिद्ध होईल.
पुरस्काराविषयी.. ही माहिती २० सप्टेंबर २०२१ पर्यंत ‘लोकसत्ता’कडे ५०० शब्दांत पाठवावी. माहितीबरोबर त्या कर्तृत्ववान स्त्रीचे छायाचित्र, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी पाठवणे आवश्यक. आलेल्या माहितीमधून परीक्षक समिती नऊ दुर्गाची निवड करेल. नवरात्रीत नऊ दिवस दररोज यातील एका दुर्गेची ‘लोकसत्ता’तून ओळख करून दिली जाईल. त्यानंतर होणाऱ्या सोहळ्यात नामवंतांच्या हस्ते नवदुर्गाचा सन्मान केला जाईल.
प्रायोजक
’मुख्य प्रायोजक : ग्रॅव्हिटस फाऊंडेशन
’सहप्रायोजक : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)