महागाईतही दिवाळीच्या दिव्यांच्या खरेदीने बाजार प्रकाशमान

तुरीची डाळ कितीही महाग झाली तरी दिवाळीच्या खरेदीपुढे महागाईची डाळ शिजत नाही हेच खरे! मातीच्या दिव्याने प्रत्येक सांदीकोपरे उजळून टाकणाऱ्या या सणाला अधिक खुलविण्यासाठी चिनी बनावटीच्या विद्युत दीपमाळांकडे यंदाही खरेदीदारांचा ओढा आहे. आकर्षक आणि ‘बजेट’मध्ये बसणाऱ्या या तोरणातील प्रकारांत यंदा ‘क्रिस्टल बॉल्स’ हा प्रकार ग्राहकांना आकर्षति करीत आहे. विविध आकारांतील ही तोरणे ८० ते अगदी दीड हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

दिवाळीला मोजून दहा दिवस शिल्लक असतानाच मुंबईच्या लोहार चाळ बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. पारंपरिक दीपमाळ खरेदी करण्याऐवजी चिनी बनावटींची विद्युत दीपमाळ खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. वजनाने हलकी, डोळे दिपवणारी, आकर्षक आणि कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या या दीपमाळेत एकूण ६० ते ७० विविध प्रकार उपलब्ध आहेत. अगदी ८० रुपयांपासून मिळणाऱ्या या माळी विविध आकारांत आणि सप्तरंगात उपलब्ध आहेत.

त्यात यंदा क्रिस्टल बॉल्सची दीपमाळ ग्राहकांना आकर्षित करत आहे. सुपारीच्या आकाराप्रमाणे असणाऱ्या या चिनी बनावटीतील दीपमाळेत सात ते आठ प्रकार आहेत. शंख, फुले, चांदणी, तुळस, नारळ, तांदूळ, डायमंड अशा विविध आकारांत सप्तरंगी दीपमाळा उपलब्ध असून या प्रकारांतील माळ खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा दिसत आहे. त्यातच तीन पणती, झाड, कमळ, जास्वंद, गुलाब, लक्ष्मी आदींच्या चित्रांवर कलर एलईडी रिबिनच्या मदतीने साकारलेल्या सजावटीला ग्राहकांची विशेष मागणी आहे.

तांदूळ आणि शंखांच्या आकारांच्या तोरणांचे सुमारे वीस प्रकार उपलब्ध आहेत. सात रंगांत असणाऱ्या या दीपमाळी सर्वात स्वस्त आणि हलक्या म्हणून ओळखल्या जात आहेत. या माळेची सुरुवात १० मीटरपासून होत असून त्यासाठी ग्राहकांना १५० ते २०० रुपये, तर ३० मीटरच्या दीपमाळेसाठी ५५० ते ६०० रुपये मोजावे लागतील. एलईडी लाइट्सची रिबिन मीटरला ५० ते १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. विविध फुलांच्या आकारांच्या दीपमाळेकरिता ३५० ते ४०० रुपये मोजावे लागतील. क्रिस्टल दीपमाळेला ज्योतिषशास्त्रात महत्त्व असल्याने या माळेच्या खरेदीकडे कल वाढत आहे. क्रिस्टल बॉल्स, क्रिस्टल डायमंड, क्रिस्टल शेल, क्रिस्टल राइस आदी प्रकार ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत. या माळा २५० ते ६५० रुपयांपर्यंत मिळत आहेत. त्यात अगदी साधी माळ ८० रुपयांनाही आहे. शिवाय ग्रॉस, एलईडी, रॉड लाइट, मेटल लाइट, ड्रॉप लाइट, फॉस्टेल लाइट, कलर स्ट्रिप आदींची खरेदीही मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिव्यांचे व्यापारी संजय गोवळे यांनी सांगितले. तसेच दीड ते दोन हजार किमतींच्या एलईडी दिव्यांनाही मागणी वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले. थोडक्यात काय, तर बाजारात दाखल झालेल्या या चिनी बनावटी वस्तूंनी बाजारपेठ काबीज केली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

स्वस्त आणि टिकाऊ

सप्तरंगी आणि आकर्षक आकारातील ही तोरणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. शिवाय दिवाळी झाली की, ही तोरणे गुंडाळून छोटय़ा बॉक्समध्ये घालून ठेवता येतात. त्यामुळे कधीकधी १५० ते २०० रुपयांचे तोरण दोन वर्षे आरामात चालते, असे खरेदीदार विनायक दिगे यांनी सांगितले.

चार दिवसांत बाजारात गर्दी

सध्या नोकरदार वर्गाचा पगार अद्याप झाला नसल्याने म्हणावी तशी गर्दी दिसत नाही, हे जरी खरे असले तरी येत्या चार दिवसांत बाजारात प्रचंड गर्दी होईल. यंदा चिनी बनावटीच्या तोरणाचे काही वेगळे प्रकार आले आहेत. ही तोरण ग्राहकांना आकर्षति करतील, असे दिव्यांचे व्यापारी देवेंद्र ठेकवडे यांनी सांगितले.