डब्यांत आकडे लावण्याच्या सूचना
उपनगरीय रेल्वेच्या डब्यांत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होत असताना अनेक प्रवासी आकाराने मोठी दप्तरे आणि खांद्यावर लटकवणारया बॅगा घेऊन प्रवास करत असल्यामुळे डब्यातील पुष्कळ जागा व्यापली जात आहे. आधीच बेसूमार गर्दीचा सामना करताना या बॅग सहप्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे डब्यात खिडकीच्या जवळ बॅग लटकवण्यासाठी आकडा बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेवर दिवसभरात २हजार ९२३ फेऱ्या चालवल्या जातात. यातून रोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. दरवर्षी प्रवासी संख्या वाढत असल्याने लोकलच्या फेऱ्या दरवर्षी वाढत असतात. मात्र असे असले तरी दोन हजारची क्षमता असलेल्या डब्यांतून सात हजार प्रवासी प्रवास करत असतात. यात ५० टक्क्यांहून अधिक प्रवासी आकाराने मोठी आणि वजनाने जड असलेली दप्तरे तसेच खांद्यांवर लटकवणाऱ्या बॅगा घेऊन प्रवास करतात. या एका बॅगेमुळे डब्यातील एका प्रवाशांच्या वाटेला आलेली जागा कमी होते. त्यामुळे डब्यात अधिक गर्दीत होते, असे वाहतूक तज्ज्ञ ऋषी अग्रवाल यांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांनी हलक्या व छोटय़ा बॅग वापराव्यात तसेच आसनाखालील जागेत बॅग ठेवाव्यात असे त्यांनी सुचवले. नेहमीच असे करणे शक्य नसेल परंतु जेव्हा शक्य असेल तेव्हा या पर्याय निवडावा असे अग्रवाल म्हणाले. गर्दीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने मुलगामी उपाययोजना कराव्यात. रेल्वे प्रवाशांनी आपणहून बॅकपॅक (अवजड बॅगा)चा उपयोग टाळून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे वाहतूक तज्ज्ञ देवेन हडकर यांनी सांगितले.
हा प्रश्न सोडवण्यासाठी डब्यात आकडे बसवता येतील. ज्यामुळे डब्यात प्रवाशांना उभे राहण्यासाठी जास्त जागा उपलब्ध होईल असे पश्चिम रेल्वेचे विभागीय समितीचे माजी सदस्य राजीव सिंघल यांनी सांगितले. तर युरोपात रेल्वेच्या डब्यात आकडे लावलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दुष्टीकोनातून छोटय़ा बॅगा घेऊन प्रवाशांनी प्रवास करावा असे रेल्वे बोर्डाचे माजी अध्यक्ष विवेक साहाय यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on heavy school bags
First published on: 03-12-2015 at 01:55 IST