मुंबई क्रूझ पार्टी प्रकरणात आता आणखी काही नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात अटकेत असलेला, अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या बँक खात्यांचा तपशील आता एनसीबीकडून तपासला जात आहे. त्यासोबतच डिलीट करण्यात आलेले व्हॉटसप मेसेजही शोधून काढण्यात येणार आहेत. या प्रकरणात आर्यन खान आणि इतर आरोपींनी मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज खरेदी केली आहे का? याची खात्री करण्यासाठी बँक खाती तसंच व्हॉटसप मेसेज तपासले जाणार आहेत. २६ ऑक्टोबर रोजी आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आता एनसीबी आर्यन खान विरोधात आणखी पुरावे गोळा करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

तपास पथकाने यापूर्वीच काही आरोपींच्या व्यवहाराच्या नोंदी गोळा केल्या आहेत ज्यांच्याकडून ‘व्यावसायिक’ किंवा मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. एनसीबी आरोपींच्या उत्पन्नाचे स्त्रोत देखील तपासत आहे, असे पीटीआयने म्हटले आहे. तपास पथक आरोपींच्या मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेटमधून डिलीट करण्यात आलेले मेसेज आणि व्हॉट्सअॅप चॅट्स शोधून काढत आहे आणि त्यांनी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे का ते तपासत आहे.

हेही वाचा – ड्रग्ज प्रकरणांत सामाजिक न्याय मंत्रालयाची महत्त्वाची शिफारस; “कमी प्रमाणात ड्रग्ज सापडल्यास…”

आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटचा वापर त्याच्याविरुद्धच्या खटल्यात मोठा पुरावा म्हणून केला जात आहे. खरं तर, त्याच्या चॅटच्या आधारे, बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेला या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार आर्यन खानने गांजा घेण्यासाठी काही ‘जुगाड’ मागितले होते, ज्याची ती व्यवस्था करेल असे अनन्याने सांगितले. एनसीबीच्या दाव्याप्रमाणे हे चॅट्स २०१८-१९ सालचे आहेत. एजन्सीने असेही म्हटले की हे तीनदा घडले आहे. अनन्याने मात्र हा आरोप फेटाळून लावला आणि सांगितले की तिच्या ह्या विषयावरच्या गप्पा हा विनोदाचा भाग होता.