मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानची जवळपास २६ दिवसांनंतर शनिवारी तुरुंगातून सुटका झाली. सुटकेनंतर तो थेट वांद्रे येथील मन्नत या निवासस्थानी गेला. शाहरूख खान याच्या चाहत्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करीत आर्यनचे तुरुंगाबाहेर स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) क्रूझ टर्मिनसवर केलेल्या कारवाईत आर्यन खानसह मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ मर्चंट यांना अटक केली होती. त्यांच्याकडून १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या आणि एक लाख ३३ हजार रोख रुपये जप्त केले होते.

आर्यनला २ ऑक्टोबरला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ३ ऑक्टोबरला त्याला ‘एनसीबी’ने अटक केली. त्यामुळे २ ते ७ ऑक्टोबरपर्यंत तो ‘एनसीबी’च्या कोठडीत होता. त्यानंतर ७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत तो मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात होता. आर्यनची जामीन प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. त्यानंतर तुरुंगातील प्रक्रिया शनिवारी सकाळी पूर्ण झाल्यानंतर आर्यनला सकाळी ११ वाजता सोडण्यात आले.

पहाटे साडेपाचच्या सुमारास कारागृहातील जामीन पत्रपेटी उघडण्यात आली. त्यातून आर्यनच्या जामिनाची आवश्यक कागदपत्रे तुरुंग प्रशासनाला प्राप्त झाली होती. आणखी पाच ते सहा कागदपत्रे त्या पेटीत होती. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आर्यनला आर्थर रोड तुरुंगातून सोडण्यात आले, अशी माहिती तुरुंगातील अधिकाऱ्यांनी दिली.

स्वागतासाठी ढोल-ताशे…

शाहरूखच्या चाहत्यांनी तुरुंगाबाहेर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तुरुंगाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. काही ठिकाणी बॅरिकेड्सही लावण्यात आले होते. तरीही शेकडो नागरिकांनी तेथे गर्दी केली. शाहरूखच्या मन्नत या निवासस्थानाबाहेरही मोठी गर्दी होती. आर्यनच्या स्वागतासाठी ढोल-ताशे वाजवण्यात येत होते. काहींनी फटाके फोडून आर्यनचे स्वागत केले. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aryan release from prison crowd of shah rukh fans akp
First published on: 31-10-2021 at 01:45 IST