दादरमध्ये भरदिवसा थरार
दादरमध्ये सोमवारी सकाळी भररस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने वार केल्याची घटना घडल्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. सोनल लपाशिया (२५) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्यावर हल्ला करणाऱ्या विजय सांगेलकर (३५) याला घटनास्थळावरून लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
विजयला आपली पत्नी वैशाली हिची हत्या करायची होती. मात्र सोनल ही आपलीच पत्नी आहे, असे समजून त्याने तिच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सोनलवर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दादर पूर्वेच्या रेल्वे स्थानकासमोर असलेल्या स्वामीनारायण मंदिराजवळ सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. भांडुप येथे राहणारी सोनल लपाशिया ही तरुणी माटुंगा येथे वाचनालयात जाण्यासाठी निघाली होती. तिने चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळला होता. त्या वेळी अचानक तिच्यासमोर आलेल्या विजयने तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या निर्घृण हल्ल्यानंतर तेथेच उभ्या राहिलेल्या विजयला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.  
सोनल भांडुपच्या बंटीपाडा परिसरात राहते. ती सीएची परीक्षा देत असून अभ्यासासाठी माटुंगा येथील वाचनालयात जात असे.   विजयचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद होते. त्यामुळे त्याने पत्नीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.