निर्बंध झुगारून दहीहंडी साजरी केल्याप्रकरणी मुंबईत नऊ, तर ठाण्यात दोन ठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. बहुतांश गुन्हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरोधातील आहेत. राज्य सरकारने सार्वजनिकरीत्या दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केली होती. मात्र, निर्बंध झुगारून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पहाटेच दहीहंडी साजरी केली. त्यानंतर बुधवारी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत यावरु महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

“गोविंदांना नोटीस काय, अटक काय या सगळ्या गोष्टी ज्या काही मुंबई आणि महाराष्ट्रात घडल्या त्या जणू सुलतानी पद्धतीच्या होत्या अशा पद्धतीचं चित्र होतं. मुख्यमंत्र्यांना आम्ही आठवण करु देतो ज्यावेळी सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात मांडला तेव्हा तुम्ही सचिन वाझे काय लादेन आहात काय म्हणालात. मग हे गोविंदा काय लादेन आहेत का? गेल्या दिड पावने दोन वर्षामध्ये ठाकरे सरकारने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. दिड पावने दोन वर्ष महाराष्ट्र बंदीवान केल्याचा रेकॉर्ड उद्धव ठाकरे यांच्या नावावर केला जाईल. मुख्यमंत्री सणांना विरोध नाही करोनाला विरोध आहे असं म्हणतात. तर मग राज्यातले रेस्टॉरंट पब, डिस्को, बार का चालू आहेत? केंद्राच्या पत्रकामध्ये येथे गर्दी होणार नाही असे म्हटले आहे का?” असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

आणखी वाचा- “संजय राऊतांना अंतर्गत शत्रूपासून धोका”; सुरक्षेत वाढ करण्यात आल्यानंतर आशिष शेलारांचा टोला

“२०१९ पर्यंत शिवसेनेची पहिल्यांदा मंदिर मग सरकार अशी घोषणा होती. २०२१ मध्ये ही घोषणा पहिल्यांदा बार नंतर मंदिर अशी झाली आहे. त्यामुळे ठाकरे सरकार निर्बंधांचा धंदा करत आहे. वाटा मिळाला की निर्बंध सैल होतात. त्यामुळे रेस्टॉरंटवाले भेटले आणि त्यांना सूट मिळाली. म्हणून निर्बंधांचा धंदा ठाकरे सरकारने बंद करावा,” असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

“मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे त्यांनी स्वातंत्र्यता आंदोलनावर बोलू नये. आधी त्यांनी हा ७५ वेळा हा भारताचा अमृत महोत्सव आहे हे बोलावे. भाजपा करोना रोखण्यासाठी सरकारच्या बाजूने आहे. पण निर्बंधांमध्ये वाटाघाटी करुन निर्बंधांचा धंद्याच्या आम्ही विरोधात आहोत,” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.