मुंबई : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी संयुक्त सरकारची २०१७ मध्येच सारी तयारी झाली होती. राष्ट्रवादीची खाती, लोकसभेच्या किती जागा लढायच्या याची सारी चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर झाली होती. शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्यास राष्ट्रवादीने विरोध केल्याने त्रिपक्षीय सरकार तेव्हा स्थापन झाले नव्हते. पण २०१९ मध्ये त्याच शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने सलगी गेली. तर शिवसेनेने सत्तापिपासूपाणाचा परमोच्च बिंदू गाठत काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली, अशी टीका  भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या वेबसंवादात बोलताना केली.‘लोकसत्ता ’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या बेवसंवादात सहभागी होताना शेलार यांनी शिवसेना – भाजप युतीचा काळ, शिवसेनेबरोबरील दुरावा, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरची परिस्थिती, भाजपची आगामी वाटचाल, मनसेबरोबरील युती आणि भोंग्यांच्या वादासह राज्यातील राजकारणाचा सरलेला स्तर याविषयी मनमोकळेपणे भाष्य केले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

शिवसेना भाजपमधील वादाविषयी बोलताना शेलार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी असतानाही शिवसेनेचे मंत्री व नेते खिशात राजीनामे ठेवल्याची आणि जहरी भाषा वापरुन त्रास देत होते. २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करण्याचा निर्णय झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेताना खात्यांचे वाटप, निवडणुकांमधील जागावाटप अशी सारीच चर्चा झाली होती. तेव्हा सरकार हे भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी असे तीन पक्षांचे सरकार असावे. शिवसेनेला सरकारमधून दूर करू नका, असा आदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिला होता. मात्र, शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्यास राष्ट्रवादीने नकार दिला. आम्हाला शिवसेनेला सरकारमधून काढायचे नव्हते. हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेनेची साथ सोडू नये, अशी भाजपचा प्रामाणिक भूमिका होती. शिवसेनेला बरोबर घेण्यात राष्ट्रवादीच्या विरोधामुळेच तीन पक्षांच्या सरकार स्थापन होऊ शकले नाही, असे शेलार यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील युतीचे पर्व आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युतीचा कालखंड याविषयी ‘ मार्मिक ‘ विवेचन करताना शेलार म्हणाले, बाळासाहेबांच्या काळात उभयपक्षी मैत्रीचा धागा होता, देवाणघेवाण होती, ते हिणवत नव्हते. त्यावेळी विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येणे शक्य असताना आणि नंदू साटम हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले असताना भाजपला दिलेल्या शब्दाखातर बाळासाहेबांनी एक जागा भाजपला दिली होती. शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यावर शिवसेनेच्या वर्तणुकीत तुसडेपणा, कुजकेपणा जाणवायला लागला. त्याची सुरुवात ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या काळातच झाली होती. त्यामुळे जरी युती होती, तरी ती आनंदायी नव्हती.

मशिदींवरील भोंग्यांचा वाद, हनुमान चालिसा, सध्या रंगलेले आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण आणि राजकारणाचा घसरलेला स्तर व गढूळपणा याविषयी शेलार यांनी चिंता व्यक्त केली. राज्याचे वातावरण गढूळ होण्यास शिवसेनेचा जबाबदार आहे. बाळासाहेबांच्या काळात ही परिस्थिती नव्हती. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती झाली. त्यानंतर शिवसेना नेत्यांकडून खंजीर, नामर्द आणि अन्य शब्दप्रयोग सुरु झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते नेहमीच भाषा वापरताना संयम ठेवतात. अन्य नेत्यांनीही भाषा वापरताना तो ठेवला पाहिजे. मात्र ही दुर्बलता आहे, असा याचा अर्थ नाही. याबाबत आम्ही अधिक चिंतन व आत्मपरीक्षण करू, असेही शेलार यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधी भक्ती बिसुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबरोबर युतीमध्ये मैत्रीचा धागा होता, पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत कुजकटपणा, जहरीपणा, तुसडेपणा, हिणविण्याची वृती वाढली. यामुळे युतीत आनंद कधीच नव्हता.

आशिष शेलार, भाजप नेते

हनुमान चालीसाहा भाजपचा कार्यक्रम नाही.

हनुमान चालीसावरून सध्या वादविवाद निर्माण होत असला तरी तो भाजपचा कार्यक्रम नाही, असे शेलार यांनी स्पष्ट केले. हनुमान चालीसाचे पठण करण्यास कोणी रोखत असल्यास त्याला आमचा विरोध असेल. फक्त हिंदूवरच बंधने का, असा सवालही त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्याशी रविवारी संवाद

‘दृष्टी आणि कोन’ या वेबसंवाद मालिकेचा समारोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीने होणार आहे. हा वेबसंवाद रविवार, १ मे रोजी दुपारी १२.३० वाजता होईल.

* मुख्य प्रायोजक :महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

* सहप्रायोजक  : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

सहभागासाठी..http://tiny.cc/LS_Drushti_ani_Kon2022 येथे ऑनलाइन नोंदणी