खासदार राहुल शेवाळे यांची उचलबांगडी
स्वागताध्यक्षपदासाठी निवड केल्यानंतर अपेक्षित आर्थिक मदतीच्या दृष्टीने योग्य प्रतिसाद न मिळाल्याने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबईत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या ‘स्वागताध्यक्ष’पदावरून खासदार राहुल शेवाळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. ‘कोमसाप’ संमेलन समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ‘कोमसाप’च्या सूत्रांकडून देण्यात आली. स्वागताध्यक्षपदासाठी आता आमदार आणि ‘भाजप’च्या मुंबई शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड्. आशीष शेलार यांना साकडे घालण्यात आले असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
‘आर्थिक मदत द्या, स्वागताध्यक्ष व्हा’ – ‘अपेक्षित आर्थिक मदत मिळाली नाही तर ‘स्वागताध्यक्ष’ बदलणार’ अशी बातमी ‘लोकसत्ता’ने ३१ ऑक्टोबरच्या ‘मुंबई वृत्तान्त’मध्ये दिली होती. ‘कोमासाप’चे १६ वे साहित्य संमेलन २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत मुंबईत दादर येथे होणार आहे. या संमेलनासाठी स्वागताध्यक्ष म्हणून खासदार राहुल शेवाळे यांची निवड करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित आर्थिक मदत किंवा निधी न मिळाल्याने शेवाळे यांना बदलावे का? अशी चर्चा ‘कोमसाप’मध्ये सुरू झाली होती. त्यानुसार सोमवारी झालेल्या बैठकीत शेवाळे यांना बदलून नव्या स्वागताध्यक्षाची निवड करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

स्वागताध्यक्ष म्हणून आपल्याकडून अपेक्षित आर्थिक मदतीचा प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही पर्याय शोधतोय, पर्यायी नावांवर विचार सुरू असल्याचे शेवाळे यांना कळविण्यात आले असल्याचेही या सूत्रांकडून सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार अ‍ॅड्. आशीष शेलार यांना स्वागताध्यक्ष करण्याबाबत ‘कोमसाप’मध्ये विचार सुरू असून अ‍ॅड. शेलार यांच्याकडेही विचारणा करण्यात आली असल्याची माहितीही या सूत्रांनी दिली.

संमेलनाध्यक्षपदावरून शेवाळे यांना बदलण्याचा निर्णय झाला आहे. नव्या नावावर विचार सुरू आहे. ‘कोमसाप’ने अद्याप कोणाचेही नाव निश्चित केलेले नाही. एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
– डॉ. महेश केळुस्कर, ‘कोमसाप’चे अध्यक्ष

स्वागताध्यक्ष होण्याबाबत ‘कोमसाप’च्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. येत्या एक-दोन दिवसांत आणखी चर्चा होईल. स्वागताध्यक्षपद आणि आर्थिक मदत असा विषय त्यांनी जोडलेला नाही. त्यामुळे मी स्वागताध्यक्ष झालो तरी किंवा नाही झालो तरी माझ्याकडून या संमेलनासाठी शक्य ती मदत मी करेन.
– अ‍ॅड. शेलार