माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना मानवंदना देण्यासाठी सीबीडी फाऊंडेशनतर्फे १६ ऑक्टोबर रोजी मुंबईत प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत ‘अटल रत्न’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर दृक्श्राव्य स्वरूपात विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. अभिनेते सुबोध भावे व अभिनेत्री स्पृहा जोशी वाजपेयी यांच्या निवडक भाषणांतील काही भागांचे वाचन करणार आहेत. गायक ऋषिकेश रानडे, मुग्धा वैशंपायन, शमिका भिडे वाजपेयी यांच्या काही कविता सादर करणार असून याचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता लेखन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांचे आहे.