पोलिस अधिकारी, न्यायाधीश यांच्यानंतर आता शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव वापरून फसवणूक करण्याचा प्रयत्न सायबर भामट्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात येणाऱ्या वरळी कोळीवाड्यातील एका २४ वर्षीय व्यावसायिक कुस्तीपटूला व्हॉट्सॲपवर ठाकरे यांच्या नावाने संपर्क साधून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहेत. नुकतीच मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या नावाने व्हॉट्सॲप प्रोफाइल तयार करून फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता.

दिपेश जांभळे हा व्यावसायिक कुस्तीपटू २३ ऑगस्ट रोजी घरी असताना सकाळी त्याला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेश आला. त्या प्रोफाईलवर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र ठेवण्यात आले होते. संदेश पाठवाऱ्याने प्रथम दिपेशची विचारपूस केल्यानंतर तू आता कोठे आहेस, असे विचारले. त्यावर त्याने घरी असल्याचे सांगितले. त्यावेळी मी आदित्य ठाकरे आहे, मला ओळखलं ना? असे विचारल्यानंतर हो, पण मी जरा गोंधळलोय, असे उत्तर दिपेशने दिले. त्यानंतर तुझ्याकडे पेटीएम आहे का असे विचारून माझ्या मित्राला २५ हजार रुपये तात्काळ पाठव, असे आरोपीने सांगितले. आरोपीने दूरध्वनी क्रमांक देऊन वारंवार तात्काळ पैसे पाठव, मी माझ्या खात्यावरून उद्या सायंकाळपर्यंत रक्कम देतो, असे सांगितले. दिपेशला संशय आल्यामुळे त्याने स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दिपेशने याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनोळखी मोबाइल क्रमांकधारक धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने दिपेशशी संभाषण करताना इंग्रजी व हिंदीचा वापर केल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – बीड : मातोश्री पतसंस्थेकडून ठेवीदारांची फसवणूक ; संचालकांविरुद्ध गुन्हा

तक्रारदार दिपेश जांभळे याने नुकतीच अझरबैजान येथे झालेल्या मिल्ली यायलाक फेस्टीवलमधील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तीन पदके जिंकली होती. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला होता. ते छायाचित्र दिपेशने त्याच्या डीपीवर ठेवले आहे. आरोपीने संपूर्ण अभ्यास करून त्याच्याशी संपर्क साधल्याचा संशय व्यक्त केला. आरोपीने फसवणुकीचा प्रयत्न केला होता. पण तक्रारदाराच्या सतर्कतेमुळे त्याने पैसे पाठवले नाहीत. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन पोलीस वारंवार करत आहेत.

त्याच क्रमांकावरून साताऱ्यातील डीजेच्या नावानेही तोतयागिरी
गंभीर बाब म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या नावाने तोतयागिरी केल्यानंतर याच क्रमांकाचा वापर करून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने सातारा येथील प्रसिद्ध डीजे आकाश फलटणच्या नावानेही तोतयागिरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. डीजे आकाशचे समाज माध्यमांवर प्रसिद्ध असून इन्स्टाग्रामवर त्याचे एक लाख ७१ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. डीजेने त्याच्या इन्स्टाग्रामवर अनेक स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. त्याच छायाचित्रांचा वापर करून आरोपीने ही तोतयागिरी केली आहे.