मुंबई: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण आणि नवी मुंबईतील विमानतळाचे ‘लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई विमानतळ’ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावांना विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये एकमताने मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर प्रत्यक्षात नामांतर होईल.

औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा निर्णय महाविकास आघाडी सरकाने अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. शिंदे- फडणवीस सरकारने मात्र हा निर्णय काही काळासाठी स्थगित केल्यानंतर त्यावरून शिंदे सरकारवर टीका झाली होती. मग तातडीने नामांतराचे निर्णय घेण्यात आला होता. औरंगाबादच्या नामांतराचा ठराव तिसऱ्यांदा घेण्यात आला आहे.

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण तर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. हे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. विधान परिषदेत हे ठराव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले होते. उभय सभागृहांमध्ये हे ठराव सहमतीने आणि एकमताने मंजूर करण्यात आले.

पुढे काय ?

विधिमंडळाने मंजूर केलेला ठराव आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठविला जाईल. गृहमंत्रालयात या ठरावावर विचार केला जातो. गृहमंत्रालयाकडून रेल्वे, टपाल खाते, सव्‍‌र्हे ऑफ इंडिया अशा विविध यंत्रणांकडून ना हरकत प्रमाणपत्र मागवून घेते. सर्व यंत्रणांनी शहराचे नाव बदलण्यास मान्यता दिल्यावर या प्रस्तावाला गृहमंत्रालय मान्यता देते. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर राज्य सरकारकडून शहराच्या नावात बदल करण्याची अधिसूचना जारी केली जाते. त्यानंतरच प्रत्यक्षात शहराचे नाव बदलले जाते.